पू. (सौ.) मालिनी देसाई (आजी) ११.७.२०२२ ते १९.७.२०२२ या कालावधीत रुग्णाईत होत्या. त्या वेळी त्यांना झालेले त्रास पुढे दिले आहेत.
१. ११.७.२०२२
१ अ. पू. (सौ.) देसाईआजींच्या मुलाच्या रूपात एका अनोळखी मुलाने पू. आजींच्या खोलीत डोकावून पाहिल्याचे त्यांना जाणवणे आणि त्यानंतर त्रासात वाढ झाल्याचे पू. आजींच्या लक्षात येणे : ‘११.७.२०२२ या दिवशी रात्री ११ वाजल्यापासून मला बरे वाटत नव्हते. माझे अंग गरम वाटत होते. मी थरथर कापत होते आणि पूर्ण शुद्ध असूनही मी बेशुद्धावस्थेत असल्यासारखे मला वाटत होते. त्या दिवशी सकाळी मला एक अनोळखी मुलगा माझ्या मुलाच्या रूपात माझ्या खोलीच्या बाहेर आलेला दिसला. मी त्याला आत बोलावले; परंतु तो आत आला नाही. त्याने दाराबाहेरूनच खोलीत २ – ३ वेळा डोकावले आणि तो गेला. तेव्हा ‘त्या मुलाने माझ्यावर अनिष्ट शक्ती सोडल्या. त्यामुळेच मला दिवसभर त्रास झाला’, असे मला वाटले. माझा नामजपही अल्प झाला. नंतर मला बोलण्याचीही शुद्ध नव्हती. मला प्रसाधनगृहात जाण्याचेही बळ उरले नव्हते.
२. १२.७.२०२२
२ अ. पू. (सौ.) देसाईआजींना पलंगावर पडल्याने पुष्कळ मुक्कामार लागून त्रास होणे, त्या वेळी कोणीतरी ‘नामजप कर. परात्पर गुरु डॉ. आठवले त्रासातून वाचवणार आहेत’, असे पू. आजींना सांगणे : १२.७.२०२२ या दिवशी मी प्रसाधनगृहात जाऊन आले आणि खोलीत आल्यावर छोट्या पलंगावर पडले. मला माझ्या हातातील बांगड्या लागल्या. पुष्कळ मुकामार लागल्याने हाताला सूज आली. माझ्या पोटालाही मार लागून पोट पुष्कळ दुखत होते. प्रत्यक्षात पलंगावरच मी पडल्याने मला एवढा मार लागणे अपेक्षित नव्हते.
रुग्णाईत असतांना नेहमीची साधिका (कु. सायली देशपांडे) माझ्याकडे सेवा करण्यास आल्यावर ‘सेवेला कोण आले आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. अशा स्थितीत मला कुणीतरी सांगत होते, ‘तू जप कर. परम पूज्यांना आळव. हा सर्व त्रासाचा भाग आहे. ते तुला वाचवतील.’ त्या परिस्थितीत नाम हाच केवळ माझा आधार होता.
२ आ. त्यानंतर मला खाल्लेले काहीही पचत नव्हते. काहीही खाल्ले, तरी लगेच उलटी व्हायची. त्यामुळे मला पुष्कळ अशक्तपणा आला होता.
३. १३.७.२०२२
३ अ. गुरुपौर्णिमेनिमित्त आश्रमात होत असलेल्या विधींना जाऊन आल्यानंतर पू. (सौ.) देसाईआजींना पुन्हा त्रास होणे : १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्यानिमित्त आश्रमात २ दिवस विधी होते. त्या विधींसाठी यज्ञाच्या ठिकाणी जाता येईल, अशी माझी प्रकृती नव्हती, तरीही ‘विधीसाठी गेले की, मला बरे वाटेल’, असा विचार करून मी यज्ञाच्या ठिकाणी गेले. खोलीत परत आल्यावर मला पुन्हा त्रास व्हायला लागला.
४. प.पू. गुरुदेवांनीच वाचवल्याचे जाणवून पू. आजींना कृतज्ञता वाटणे
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेले नामजपादी उपाय केल्यावर मला बरे वाटू लागले. तेव्हा ‘अनिष्ट शक्ती माझा मृत्यू घडवून आणणार होत्या; पण प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी वाचले. त्यांनीच मला वाचवले’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– (पू.) सौ. मालिनी देसाई (वय ७६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२२)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |