Hamare Baarah : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून ‘हमारे बारह’ चित्रपटावर बंदी !

बेंगळुरू (कर्नाटक) – मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्‍या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान  संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयापूर्वी ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरही मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली होती; मात्र नंतर ही बंदी उठवण्यात आली.

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक सिनेमा (नियमन) कायदा, १९६४ च्या कलमांनुसार, कर्नाटक सरकारने ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रसारणावर किंवा प्रदर्शनावर २ आठवड्यांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातली आहे. या प्रकरणी सरकारचे म्हणणे आहे की, हा चित्रपट राज्यात प्रदर्शित करण्याची अनुमती दिल्यास जातीय तणाव निर्माण होईल. चित्रपटाचे छोटे विज्ञापन (ट्रेलर) पाहिल्यानंतर अनेक अल्पसंख्यांक संघटना आणि शिष्टमंडळ यांंच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानप्रेमी काँग्रेस सरकारच्या राज्यात याहून वेगळे काय होणार ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांवर काँग्रेसने बंदी कधी घातली आहे का ?