मिहीर कोटेचा यांचा पराभव बांगलादेशींमुळे ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या

मुंबई – मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील निवडणूक प्रारंभीपासूनच भाषिक आणि धार्मिक सूत्रांवर लढली गेली. मराठी-गुजराती भाषिक आणि हिंदु-मुसलमान या धार्मिक सूत्रांवर मतदारांचे विभाजन झाले. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार किरीट सोमय्या निश्चितपणे निवडून येतील अशी अपेक्षा होती. मानखुर्द येथील बांगलादेशी मतांमुळे मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला, अशी टिपणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ‘एक्स’ खात्यावरून केली आहे.

यामध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुलुंडमध्ये कोटेचा यांना १ लाख १६ सहस्र ४२१ मते, तर संजय दीना पाटील यांना ५५ सहस्र ९७९ मते मिळाली. या उलट मानखुर्द (बांगलादेशी क्षेत्र) या एका विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १ लाख १६ सहस्र ७२ मते मिळाली, तर भाजपला २८ सहस्र १०१ मते मिळाली. या मतदारसंघामध्ये संजय दिना पाटील यांना एकूण ४ लाख ४८ सहस्र ६०४ मते मिळाली, तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांना ४ लाख १९ सहस्र ५८९ मते मिळाली. मानखुर्दमध्ये मते न मिळाल्याने कोटेचा यांचा पराभव झाला.