चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’चे मत !
बीजिंग (चीन) – भारतातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून या दिवशी लागणार आहे. त्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने या अंदाजावर एक वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात म्हटले आहे की, मोदी भारतासाठी निश्चित केलेल्या देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करत रहातील. काही वर्षांत अमेरिका आणि चीन यांच्यानंतर भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवण्यावर त्यांचा मुख्य भर रहाणार आहे.
या वृत्तात सिंघुआ विद्यापिठाच्या ‘नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूट’च्या संशोधन विभागाचे संचालक कयान फेंग यांनी म्हटले आहे की, मोदी यांच्या धोरणात्मक दृष्टीकोनातून राजनैतिक मार्गाने भारताचा जागतिक प्रभाव वाढवण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. भारताला आघाडीची शक्ती बनवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे.
या वृत्तात भारत आणि चीन यांच्यात दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.