संपादकीय : आत्मनिर्भर भारताचे दशक आणि अपेक्षा !

‘मेक इन इंडिया’ या मोहिमेला २५ सप्टेंबर या दिवशी १० वर्षे पूर्ण झाली. २५ सप्टेंबर २०१४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेची पायाभरणी केली होती. या मोहिमेमुळेच भारत आंतरराष्ट्रीय पटलावर मोहोर उमटवत आहे. गुंतवणूकदारांसाठी आशादायी ठरणारी ही मोहीम त्यांना भरभराटीच्या शिखरापर्यंत नेऊन पोचवत आहे. जे कधीही साध्य होऊ शकले नाही किंवा शकले नसते, ते मोदींनी या माध्यमातून करून दाखवले आहे. या दशकपूर्तीच्या वाटचालीनिमित्त पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांचे भाषण केले आणि देशाची झालेली भरभराटही अधोरेखित केली. त्याविषयीची सूची अपुरीच पडेल. या दशकपूर्तीच्या निमित्ताने भारतातील मोठमोठी आणि उच्च दर्जाची आस्थापने, तसेच महत्त्वाची पदे सांभाळणार्‍या अधिकारी व्यक्ती यांनीही भारताचे अभिनंदन केले आहे. ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२४’मध्ये १३३ जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत आता ३९ व्या स्थानावर आहे. लोकमान्य टिळक एकदा व्यासपिठावरून भाषण देतांना म्हणाले होते, ‘भारताची संरक्षणव्यवस्था भक्कम करायची असेल, तर स्वदेशी शस्त्रे निर्माण करावी लागतील.’ ‘आज टिळकांचे हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे ‘मेक इन’ ही मोहीम खरोखर क्रांती घडवणारी ठरली. भारताचे उज्ज्वल भविष्य या मोहिमेने निर्माण केले. यासाठी यात योगदान देणार्‍या प्रत्येक व्यक्तीची कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. ‘मेड इन इंडिया’ मोहीम प्रगतीपथावर आहे. येत्या १० वर्षांत भारत या मोहिमेच्या बळावर आणखी काही शिखरे पादाक्रांत करून पहिल्या अर्थव्यवस्थेचा सन्मान प्राप्त करील, हे प्रत्येक भारतियाचे स्वप्न आहे आणि ते सत्यात येईल, याचीही प्रत्येकाला निश्चिती वाटते.

पुढील ध्येये !

‘मेक इन इंडिया’ या मोहिमेचे यश

इतकी वर्षे परकीय आक्रमकांच्या तावडीत अन्याय-अत्याचार सहन करणारा भारतीय समाज, त्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारच्या देशविरोधी धोरणांमुळे अक्षरशः पिचून गेलेला भारतीय समाज आणि आता ‘स्वतःच्या पायांवर आपण उभे राहून प्रगती करू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण झालेला भारतीय समाज, हे केवळ आणि केवळ ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेचे यश आहे. प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे रहावे, यासाठी प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील पहिलेच पंतप्रधान असतील. ‘मेक इन इंडिया’ येण्याआधी अनेकदा भारतीय बोलतांना ‘मेड इन इंडिया’, असे म्हणत; पण त्यात जोर नसायचा. आता ‘मेड इन इंडिया’ आपण अभिमानाने म्हणू शकतो; कारण ‘मेक इन इंडिया’ फलद्रूप होतांना दिसत आहे. कोणे एके काळी पारतंत्र्य अनुभवलेल्या भारतासाठी हे निश्चितच कौतुकास्पद आहे. हीच सशक्त भारताची निर्मिती आहे. वर्षानुवर्षे आपले मौल्यवान पैसे आपण विदेशींच्या घशात घालत होतो. त्याला आता पायबंद बसला आहे; परंतु यशाच्या या भरभराटीमुळे किंवा स्वतःच्या पायावर उभे राहिल्याच्या आनंदात आता थांबून चालणार नाही, तर तितक्याच जोमाने सिद्ध व्हायला हवे. जे उत्पादन आपण भारतात निर्माण करू लागलो, त्याची बाजारपेठ आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित होण्यासाठीही पावले उचलली पाहिजेत. तसे झाल्यास खर्‍या अर्थाने या मोहिमेला बळकटी प्राप्त होईल. भारताच्या शत्रूंनी भारतात त्यांची बाजारपेठ निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केलेली आहे. ही बाजारपेठ हळूहळू नष्ट करून त्यांच्याच नाकावर टिच्चून अन्य राष्ट्रांत भारताची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करणे, हे यापुढील ध्येय असायला हवे. भारताला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर घडवतांना शत्रूराष्ट्रांच्या खेळी, त्यांचे डावपेच, त्यांची भूमिका यांकडे लक्ष द्यायला हवे.

दुर्लक्षित बाजू !

भारतात काही ठिकाणी नैसर्गिक स्रोतांचा र्‍हास झाला आहे, त्याचे परिणामही आता भोगावे लागत आहेत.

‘मेक इन इंडिया’चे हे यश जरी आपण अनुभवत असलो, तरी याच्या काही दुर्लक्षित बाजूही आहेत. त्यांना नाकारून चालणार नाही. ‘मेक इन’च्या जगात तुलनेत शेतीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. अनेक जण शेती सोडून उद्योगधंद्यांकडे वळले. शेतीसाठी जरी विविध योजना, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी तरुण पिढीला काबाडकष्टापेक्षा सहजगत्या जे मिळेल, त्याचे आकर्षण अधिक असते. त्यामुळे काही ठिकाणी शेतभूमी ओस पडू लागल्या. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष करणे देशाला परवडणार नाही. काही ठिकाणी नैसर्गिक स्रोतांचा र्‍हास झाला. त्याचे परिणामही आता भोगावे लागत आहेत. काही प्रमाणात लघुउद्योजकांना हानी सोसावी लागली. आंतरराष्ट्रीय ‘ब्रँड्स’मध्ये लोकांना अधिक रस असल्याने स्वदेशीचा पाया डळमळीत झाला. आताही भारतीय बाजारपेठेत भारतीय उत्पादनांपेक्षा आंतरराष्ट्रीय उत्पादनांना अधिक मागणी असते. स्वदेशीचा पाया डळमळीत होता कामा नये. याकडे लक्ष केंद्रित करायला हवे. ‘मेक इन’ मोहिमेने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका उंचीवर नेऊन ठेवलेले असले, तरी देशातील गरिबी म्हणावी तितकी न्यून झालेली नाही. गरिबी न्यून झाली, तरच खर्‍या अर्थाने गुन्हेगारीचे प्रमाण उणावेल. त्यासाठी बेरोजगारीही नष्ट व्हायला हवी. जेव्हा देश गुन्हेगारीमुक्त होईल, राष्ट्रद्वेषी विचारसरणी नष्ट होईल, महिलांचा यथोचित् आदर-सन्मान राखला जाईल, तसेच भावी पिढी सुसंस्कारित असेल, त्या दिवशी खर्‍या अर्थाने भारत यशोशिखरावर पोचलेला असेल.

खरा उत्कर्ष !

आपण उत्पादने, गुंतवणूक, व्यापार यांसंदर्भात पुढील पावले टाकत आहोत; पण देशाचा उत्कर्ष केवळ यातच सामावलेला आहे का ? तर नाही. देशाचा पाया म्हणजे नागरिक आहे. तो जर सशक्त असेल, तरच देशाचा गाडा पुढे नेऊ शकतो. देशाचा नागरिक केवळ शारीरिकदृष्ट्या सशक्त असणे अपेक्षित नाही, तर मानसिक, शैक्षणिक, नैतिक, आध्यात्मिक अशा सर्वच दृष्टींनी तो सशक्त असायला हवा. उत्पादनांसाठी जसा स्वदेशीचा पाया निर्माण करण्यात आला, त्याचप्रमाणे भावी पिढी सुसंस्कारित होण्यासाठी तिच्यातील नैतिकता भक्कम करणे आवश्यक आहे.

आज प्रत्येकाचे लक्ष उत्तुंग प्रगतीकडे आहे; पण मनाची धारणा दुर्बल आहे. तिला ना संस्कारांचे बळ आहे, ना धर्मशिक्षणाचे, ना राष्ट्राभिमानाचे ! क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांच्यात नैतिकता, संस्कार यांसह राष्ट्राभिमान भिनलेला होता. त्यामुळेच ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकले. आजच्या पिढीमध्ये हे सर्व निर्माण करणे, ते वृद्धींगत करणे आणि समाजमन घडवणे याची नितांत आवश्यकता आहे. ‘मेक इन’चा वारू आता चौफेर उधळला आहेच. त्याने भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या जोडीला नैतिकता जपली, तर उन्नत समाज घडेल अन् तोच सर्वंकष विकास आणि राष्ट्रोत्कर्ष साधेल.

भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या जोडीला नैतिकता जपल्यास सर्वंकष विकास अन् राष्ट्रोत्कर्ष साधणारा उन्नत समाज घडेल !