|
नागपूर – जगविख्यात भंडारदर्यातील काजवा महोत्सवाच्या काळात पर्यटकांनी हुल्लडबाजी आणि मद्यपान केले. यासंदर्भातील तक्रारी निसर्गप्रेमींनी केल्या आहेत. पर्यटकांचा गोंधळ, तसेच त्यांची संख्या वाढल्याने त्यांच्या वाहनांच्या दिव्यांचा तीव्र प्रकाश यांमुळे काजव्यांची संख्या वेगाने अल्प होत आहे. मादीला आकर्षित करण्यासाठी नर काजवे प्रकाश सोडतात. ते बघून माद्या भूमीवरील पालापाचोळा आणि रानवाटांवर बागडतात; कारण त्यांना उडता येत नाही; मात्र वर उडणारे काजवे पहाण्याच्या नादात पर्यटकांकडून मादी काजवे पायदळी येतात. ते चिरडले जातात. काही वेळा छायाचित्र काढतांना कॅमेर्याचा फ्लॅश झाडांवर पडतो. त्या उजेडामुळे काजवे पळ काढतात.
प्रतिदिन ३० ते ३५ सहस्र पर्यटक येथे येत आहेत. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांना येथे प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ‘या पर्यटनावर नियंत्रण आणावे, अन्यथा हा महोत्सव बंद करावा’, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. ‘काजवा महोत्सवादरम्यान वन विभागाकडून सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे’, असे विधान वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी केले आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणार्या कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या पायथ्याशी हा महोत्सव आयोजित केला जातो. पावसाळा चालू होण्याआधी झाडांवर काजव्यांचा लखलखाट असतो. तो पहाण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात.
संपादकीय भूमिकाअसे होत असेल, तर पर्यटकांना सक्त ताकीद का दिली जात नाही ? |