कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आरोप
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमधील आमचे सरकार उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्ष काळी जादू करत आहेत, असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच काँग्रेसचे नेते असलेले डी.के. शिवकुमार यांनी केला आहे. ‘प्रसारमाध्यमांनी राजराजेश्वरी मंदिराजवळ पहाणी करावी, त्यांना सत्य समजेल’, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणी शिवकुमार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा नेत्याचे नाव घेतले नाही.
शिवकुमार पुढे म्हणाले की, विरोधकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माझ्याविरोधात काळ्या जादूचा प्रयोग करत शत्रू भैरवी यज्ञ केला आहे. केरळमधील तांत्रिकांच्या साहाय्याने राजराजेश्वरी मंदिराच्या जवळ एका निर्जन स्थळी काळ्या जादूचे विधी करण्यात आले. या विधीमध्ये पशूंचाही बळी दिला गेला. अघोरी यज्ञामध्ये २१ बकर्या, ३ म्हशी, २१ काळ्या मेंढ्या आणि ५ डुक्कर यांचा बळी दिला गेला आहे. शत्रूचा समूळ नाश करण्यासाठी या यज्ञात पंचबळी (५ प्रकारचे बळी) देण्यात येतात.
मी माझ्या मनगटावर पवित्र धागा बांधला आहे. वाईट नजरांपासून वाचण्यासाठीच हे कवच मी बांधले आहे. आमची देवावर नितांत श्रद्धा असून लोकांचे आशीर्वाद आमच्यासमवेत असल्यामुळे आम्ही यापासून वाचू, असा विश्वास आम्हाला आहे.
‘तुमचा अशा अंधश्रद्धांवर विश्वास आहे का ?’ असा प्रश्न उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, विरोधकांचा आम्हाला हानी पोचवण्याचा प्रयत्न असला, तरी आमचा ज्या शक्तीवर विश्वास आहे, ती शक्ती आमचे रक्षण करेल. त्यांनी माझ्या विरोधात काहीही प्रयोग करू द्या, एक शक्ती आहे, जिच्यावर माझा विश्वास आहे. ती मला वाचवेल.
संपादकीय भूमिकाजर हे सत्य आहे, तर शिवकुमार अशांवर कारवाई का करत नाही ? |