‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।।’, हे संत ज्ञानेश्वरांचे वचन सार्थ करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१. संत ज्ञानेश्वर यांची आनंदाची व्यापकता !

१ अ. लोकांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा केलेला अतोनात छळ : ‘संत ज्ञानेश्वरांना त्यांच्या अल्पशा आयुष्यात अतोनात कष्ट भोगावे लागले. संत ज्ञानेश्वर यांच्या लहानपणीच त्यांचे माता-पिता देवाघरी गेले. लोकांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांना बहिष्कृत करून गावाबाहेर काढले. लोकांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे यांना कुणी चुकून भिक्षा दिली, तर दुसर्‍याने ते भिक्षेचे पीठ भूमीवर टाकावे आणि ते पीठ उचलू नये; म्हणून तिसर्‍याने ते पायाने मातीत मिसळावे. असे अपार त्रास ज्ञानेश्वरांसारख्या अवतारी संतांनाही चुकले नाहीत.

१ आ. स्वतः त्रास भोगूनही संत ज्ञानेश्वर यांची समष्टी कल्याणाची तळमळ : एवढे असूनही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ।’ म्हणजे ‘संसार ज्या ब्रह्मस्वरूपावर मिथ्या भासलेला आहे, ते ब्रह्म सुखरूप आहे आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानरूप (आधारभूत) असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे, असे ज्ञानसंपादन करून संसार सुखरूप करीन.’ संत ज्ञानेश्वर यांच्या कोणत्याही रचनेत त्यांना झालेल्या त्रासाचा लवलेशही सापडत नाही. त्यांच्या ग्रंथसंपदेत केवळ समष्टी कल्याणाची तळमळ दिसते. केवढी मोठी आनंदाची व्यापकता आहे ही !

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उदात्त विचारांची व्यापकता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामराज्य स्थापन करण्याचा केलेला संकल्प ! : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी असाच व्यापक ‘अवघाचि संसार सुखाचा करणारा’ ‘रामराज्याचा’ संकल्प केला आहे. त्यांचे साधकांना एवढेच सांगणे आहे की, आध्यात्मिक आनंदासाठी साधना करावी. असे केल्याने त्यांना ‘ईश्वरप्राप्ती’ होईल. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला रामराज्याचा संकल्प हा संपूर्ण सृष्टीसाठी आहे. त्यांच्यासारख्या अवताराचे कार्य हे केवळ मानवी जीवनापुरते मर्यादित नसून चराचर सृष्टीसाठी आहे. त्यांच्या उदात्त विचारांची व्यापकता तिन्ही लोक व्यापून टाकणारी आहे.

२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून करून घेत असलेली व्यापक साधना ! : साधकांनी साधना करतांना आनंद अनुभवणे महत्त्वाचे आहे. त्रास, संघर्ष या सर्व गोष्टी असणारच आहेत. साधक भोगत असलेला समष्टी त्रास हा उद्याच्या पिढीसाठी ‘रामराज्य’ आणणारा आहे आणि पुढच्या पिढीचे आयुष्य कृतार्थ करणारा आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांकडून केवढी व्यापक साधना करून घेत आहेत !’, याची साधक कल्पना करू शकत नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाची व्यापकता संपूर्ण सृष्टीसाठी आहे आणि गुरुकृपेने साधकांना त्या संकल्पात सहभागी होण्याची संधी लाभली आहे. साधकांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करून साधनेचा आनंद घेण्याचा प्रयत्न केल्यावर आणि ‘इतरांनाही तो आनंद घेता यावा’, यासाठी ते क्रियाशील असले की, या संपूर्ण सृष्टीत लवकरच रामराज्य अवतरेल.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले इतरांना आनंद देण्यासाठी सहन करत असलेले त्रास : परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अल्प असल्याने अनेक वर्षे ते खोलीच्या बाहेर पडले नाहीत. राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात परात्पर गुरु डॉक्टर स्वतः झेलत आहेत. त्यामुळे त्यांना सतत त्रास, आजार आणि शारीरिक कष्ट यांना सामोरे जावे लागत आहे; मात्र याचा त्यांनी कधीच साधकांच्या साधनेवर परिणाम होऊ दिला नाही. ते स्वतः ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे अपार कष्ट भोगून नेहमी इतरांना आनंद देण्यासाठीच जगत आहेत. आपणही आता हा आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करूया !

३. साधकांचे कर्तव्य

आपल्या गुरूंनी रामराज्य आणण्याचा संकल्प केला आहे, तर किमान आपण आनंदी राहून आपल्या सहसाधकांना आनंदी ठेवण्यासाठीचे प्रयत्न नक्कीच करू शकतो. आपण भोगलेले त्रास उद्या इतरांना आनंद देणारे असतील. आपल्या आनंदाची व्यापकता वाढवूया ! जीवनात खरा आनंद इतरांसाठी जगण्यात आहे. गुरूंच्या या व्यापक ईश्वरी कार्याचा आनंद स्वतः समवेत आता या संपूर्ण सृष्टीलाही देऊया !’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.