प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करा ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनाचा परिणाम !

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, तसेच विविध विभागांचे अधिकारी

पंचगंगा नदी प्रदूषण आणि उपाययोजना यांविषयी बैठक

कोल्हापूर – पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनेसह प्राधान्य देण्यास सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. प्रदूषण करणार्‍या घटकांवर कारवाई करावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी आणि उपाययोजनांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. २४ मे या दिवशी पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने याची नोंद घेऊन तात्काळ २५ मे या दिवशी ही बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

दैनिक‘ सनातन प्रभात’ने पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी वेळोवेळी उठवला आवाज !

शहरातील विविध नाल्यांचे सांडपाणी, तसेच विविध कारणांमुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे आणि याकडे विविध प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष आहे. यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ने वेळोवेळी आवाज उठवला आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार वर्ष २०१४ मध्ये समिती गठीत करण्यात आली आहे. यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्वच यंत्रणांचे अधिकारी समितीमध्ये आहेत. याच्या प्रगतीचा अहवाल प्रत्येक ३ महिन्यांनी सादर केला जातो. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी पाणी शुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील उर्वरित काही ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया यंत्रणा बसवण्याचे चालू असून कामे संबंधित यंत्रणेकडून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तात्कालिक उपाययोजनांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्यानुसार पंचगंगा नदी नव्याने कोणत्याही प्रकारे प्रदूषित होणार नाही आणि प्रदूषण करणार्‍या घटकांवर कायद्यानुसार कारवाई करावी. पंचगंगा नदी प्रवाहित होण्यास प्राधान्य देऊन होणार्‍या प्रदूषणाविषयी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

संपादकीय भूमिका :

नदीतील प्रदूषण उघडपणे होत असतांना गणेशोत्सवाच्या वेळी कांगावा करणारे पुरोगामी कुठे आहेत ?