नागपूर येथे अपघात करणार्‍या २ महिलांचा जामीन न्यायालयाने नाकारला !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – २५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री रामझुल्यावरून मध्यरात्री दीड वाजता शहरातील मोठ्या उद्योजक कुटुंबातील २ महिलांच्या वाहनाने दुचाकीवरील २ तरुणांना धडक दिली होती. या प्रकरणी २४ मे या दिवशी सत्र न्यायाधीश आर्.एस्. पाटील यांच्या न्यायालयाने त्या महिलांचा जामीन नाकारला आहे. अपघात करणार्‍या महिलांनी त्या विरोधात न्यायमूर्ती उर्मिला जोशी फलके यांच्या सुटीकालीन खंडपिठात याचिका प्रविष्ट केली. यावर आता २७ मे या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मद्याच्या नशेत भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात महंमद हुसैन (३४ वर्षे) आणि महंमद आतिक (वय ३२ वर्षे) ठार झाले होते. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी वाहनचालक महिला रितीका उपाख्य रितू मालू (वय ३९ वर्षे) आणि माधुरी सारडा (वय ३७ वर्षे) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता. घटनेच्या रात्री मेजवानी करून त्या मध्यरात्री घरी जातांना त्यांच्याकडून हा अपघात झाला.

या प्रकरणी तहसील पोलिसांवर खटल्यात जामीनपात्र कलमे लवण्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकार्‍यांनी जामीन दिला होता. त्या विरोधात पोलिसांनी १२ मार्च या दिवशी सत्र न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले होते. सत्र न्यायालयात २ महिने जामिनावर सुनावणी आणि युक्तीवाद करण्यात आला.