आम आदमी पक्षाचा पाय खोलात !

जो पक्ष महिलांचा सन्मान करत नाही आणि ज्याचे नेते चारित्र्यवान नाहीत, अशा पक्षांना जनतेनेच मतपेटीतून जागा दाखवायला हवी !

‘१०-११ वर्षांपूर्वी स्वामी रामदेवबाबा आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध  आंदोलन केले होते. या आंदोलनाचा लाभ उठवत अरविंद केजरीवाल यांनी ‘आम आदमी पक्ष’ स्थापन केला. त्यानंतर त्यांनी या पक्षाखाली निवडणूक जिंकून देहलीची २ वेळा सत्ता मिळवली. एवढेच नाही, तर पंजाबचीही सत्ता मिळवली. सध्या अशी स्थिती आहे की,  जेवढ्या वेगाने ते पुढे गेले, तेवढ्याच वेगाने त्यांचा सर्व कार्यक्रम आटोपणार का ? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

१. मद्य घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षावर आरोप

मद्य घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाला आरोपी करण्यात आले आहे. ‘पीएम्एल्ए (मनी लाँडरिंग प्रतिबंधक) कायदा’ कलम ७० नुसार एखाद्या आस्थापनेला आर्थिक अपहारामध्ये आरोपी करता येते. हाच निकष त्यांनी ‘आप’ पक्षाच्या विरुद्ध लावला. या पक्षावर लावलेल्या आरोपानुसार त्यांना आंध्रप्रदेशमधून १०० कोटी रुपये हवाला माध्यमातून मिळाले. यातील ४५ कोटी रुपये गोव्यातील निवडणुकीसाठी व्यय करण्यात आले. ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल एक १९५१’च्या उपकलम (अ) आणि (ब) मध्ये पक्ष, म्हणजे आस्थापन धरले जाते. कुठलाही पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाकडे नोंदणी करता येते. आता ८ वे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले. त्यात न्यायालयाने हाच निकष लावला.

२. केजरीवालांचा निगरगट्टपणा

या प्रकरणात ‘आप’ पक्षाचे अनेक नेते आजही कारागृहात आहेत. सहानुभूतीचे भांडवल कसे करायचे, हे केजरीवाल यांना चांगले ठाऊक आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीपुरता अनेक अटींसह जामीन दिला. आता ते म्हणतात, ‘‘इंडि आघाडीची सत्ता आली, तर मी पुन्हा कारागृहात जाणारच नाही.’’ सर्वोच्च न्यायालयाहून ‘इंडि आघाडी’ मोठी असाच त्याचा अर्थ होतो.

३. केजरीवाल यांच्या स्वीय सचिवाची त्यांच्याच महिला खासदाराला मारहाण

काही दिवसांपूर्वी ‘आप’च्या राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांना केजरीवाल यांचे विशेष कार्याधिकारी विभव कुमार यांनी मारहाण केली आणि त्यांचा विनयभंग केला. खासदार मालीवाल यांची ‘एम्स’ रुग्णालयात तपासणी झाली, तेव्हा वैद्यकीय अहवालात ‘त्यांच्या तोंडवळ्याच्या अंतर्गत इजा झाल्या आहेत’, असे म्हटले आहे. ‘विभव यांनी तिच्या पोटात आणि पोटाखाली लाथा मारल्या, तसेच तोंडावर थापडा मारल्या’, असा आरोप तिने केला. या प्रकरणी विनयभंगासह प्राणघातक आक्रमण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, अशोभनीय टिपणी करणे इत्यादी आरोप विभव कुमार विरुद्ध करण्यात आले आहेत आणि तसे कलम घातलेली आहेत.

साधारणतः कुठल्याही मंत्र्याचे स्वीय सचिव हे कर्मचार्‍याच्या भूमिकेत असतात, म्हणजेच ते त्यांचे नोकर असतात. असे असतांना केजरीवाल यांच्या स्वीय सचिवाची एका महिला खासदाराला मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. केजरीवाल यांचे अशी काय गुपिते आहेत की, जे विभव कुमार यांना ठाऊक आहेत ? आणि म्हणून विभव कुमारचा उद्दामपणाही केजरीवालांना सहन करावा लागत आहे ? या ठिकाणी ‘नाकापेक्षा मोती जड’, ही उक्ती लागू होते. विभव कुमार विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. त्यात त्यांनी स्वाती मालीवाल यांचा विनयभंग करून मारहाणही केली आहे. हा गुन्हा सिद्ध झाला, तर विभव कुमार यांना अनुक्रमे २ वर्षे आणि १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

विभव कुमार व स्वाती मालीवाल

४. राष्ट्रीय महिला आयोगाच्या समन्सला विभव कुमारचे असहकार्य

समाजमाध्यमांमध्ये एक अशीही चित्रफीत प्रसारित झाली. त्यात स्वाती मालीवालच विभव कुमारला धमकावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यात केजरीवालांची पत्नीही दिसत असून ती ‘मारहाण करा’, असे म्हणत आहे. हा सर्व भाग पुराव्याचा आहे आणि न्यायव्यवस्थेत हे सर्व प्रकरण सिद्ध होईलच; पण केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्‍या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ? नारीपूजन करणारी अशी हिंदु संस्कृती आहे. स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमारला समक्ष उपस्थित रहाण्यासाठी समन्स बजावले; मात्र या नोटिसीला विभव यांनी प्रतिसाद दिला नाही. त्या वेळी ते केजरीवाल यांच्यासमवेत निवडणुकीच्या प्रचार दौर्‍यात होते. यासंदर्भात केजरीवाल यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांच्याकडे ‘माईक’ दिला. यात त्यांचा प्रचंड उन्मत्तपणा दिसून आला. केजरीवाल कारागृहात भगवद्गीता आणि रामायण घेऊन गेले होते. ते विसरले का की, एका अपमानामुळे महाभारत घडले होते ? या युद्धात दुर्योधन आणि दुःशासनही संपले होते. लोकशाहीत जनतेने केलेल्या न्यायाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यांच्या गुन्ह्यांचा न्याय या निवडणुकीत जनता करील का ? हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.’ (२०.५.२०२४)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ मधील कलम ७० कंपन्यांचे गुन्हे याचे विवरण

१. या कायद्यातील कोणत्याही प्रावधानांचे (तरतुदींचे) किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमांचे, निर्देशांचे किंवा आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती ही कंपनी असेल, तर प्रत्येक व्यक्ती जी, ज्या वेळी हे उल्लंघन करण्यात आले होते, तो प्रभारी होता आणि त्यास उत्तरदायी होता. कंपनीच्या तसेच कंपनीच्या व्यवसायाच्या वर्तनासाठी आणि उल्लंघनासाठी दोषी असल्याचे मानले जाईल आणि त्यानुसार कार्यवाही करण्यास आणि शिक्षेस पात्र असेल; परंतु या पोटकलममध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही व्यक्तीने असे उल्लंघन त्याच्या नकळत घडले असल्याचे सिद्ध केल्यास किंवा असे उल्लंघन थांबवण्यासाठी त्याने योग्य ती तत्परता दाखवली असल्याचे सिद्ध केल्यास अशी कोणतीही व्यक्ती शिक्षेस पात्र ठरणार नाही.

२. उपकलम (१) मध्ये काहीही असले, तरी या कायद्याच्या कोणत्याही प्रावधानांचे किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमाचे, निर्देशाचे किंवा आदेशाचे उल्लंघन एखाद्या कंपनीने केले आहे आणि असे सिद्ध झाले की, हे उल्लंघन कंपनीने केले आहे. कोणत्याही कंपनीच्या संचालक, व्यवस्थापक, सेक्रेटरी किंवा इतर अधिकार्‍याची संमती किंवा संगनमत किंवा कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही दुर्लक्षास कारणीभूत आहे, असे संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारीही उल्लंघनासाठी दोषी मानले जातील आणि त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्यास आणि त्यानुसार शिक्षा करण्यास पात्र.

याविषयीचे दोन्हीविषयीचे स्पष्टीकरण १ :

अ. या विभागाच्या उद्देशांसाठी

आ. कंपनी म्हणजे कोणतीही संस्था कॉर्पोरेट आणि त्यामध्ये फर्म किंवा व्यक्तींची इतर संघटना समाविष्ट आहे.

इ. संचालक, फर्मच्या संबंधात, म्हणजे फर्ममधील भागीदार.

स्पष्टीकरण २ : शंका दूर करण्यासाठी स्पष्ट केले आहे की, एखाद्या कंपनीवर खटला चालवला जाऊ शकतो, तरीही कोणत्याही कायदेशीर न्यायिक व्यक्तीचा खटला चालवणे किंवा दोषी ठरवणे हे कोणत्याही व्यक्तीच्या खटला किंवा दोषींवर अवलंबून असेल.

(अधिनियमाद्वारे घातलेले २०१३ चा क्रमांक २)