१. नियोजित सेवा करतांना ऐन वेळी दुसरी सेवा पूर्ण करावी लागणे आणि नियोजित सेवा अपूर्ण राहिल्याचा ताण येणे
‘मी नियोजित सेवा करत असतांना काही वेळा मला अन्य सेवाही कराव्या लागतात. त्यामुळे माझ्या नियोजित सेवा प्रलंबित रहातात. काही वेळा संबंधित साधक माझा पाठपुरावा करतात आणि नियोजित सेवा पूर्ण झाली नाही, तर त्याविषयी माझ्या उत्तरदायी साधकांना सांगतात. याचे मला वाईट वाटत असे. माझ्या मनात ‘मी साधकांचा विश्वास कधीच संपादन करू शकणार नाही’, असा नकारात्मक विचार येत असे. ‘माझ्याकडून त्यांनी सांगितलेली सूत्रे वेळेत पूर्ण होत नाहीत’, या विचारामुळे माझा संघर्ष होत होता. यात माझी ऊर्जा व्यय होत असे. असे सतत घडल्यास माझा संयम सुटत असे.
२. देवाने ‘निराश न होता उपाययोजना काढून प्रयत्न करायचे आहेत’, असे सुचवल्यावर ध्यानमंदिरात जाऊन प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन करणे आणि त्यानंतर सूक्ष्मातून दिसलेले दृश्य
एकदा सलग प्रसंग घडत असल्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष होत होता. त्या वेळी देवाने मला विचार दिला, ‘निराश न होता उपाययोजना काढून प्रयत्न करायचे आहेत.’ मी ध्यानमंदिरात जाऊन प.पू. गुरुदेवांना आत्मनिवेदन केले. त्या वेळी मला दिसले, ‘गणेशोत्सवापूर्वी मूर्तीकार श्री गणेशाची मूर्ती बनवायला प्रारंभ करतात. श्री गणेशचतुर्थीच्या काही दिवस आधी मूर्ती बनवायच्या प्रक्रियेला वेग येतो, म्हणजे मूर्तीकार आधीच्या तुलनेत अधिक गतीने मूर्ती घडवत असतात; कारण त्यांना मूर्ती श्री गणेशचतुर्थीपर्यंत पूर्ण करायच्या असतात. तसेच माझे आहे. देव माझी मूर्ती घडवत आहे, म्हणजे मला साधनेत घडवत आहे. मला घडवण्याची समयमर्यादा भगवंतच जाणतो. भगवंत ज्या गतीने माझी मूर्ती बनवत आहे, तो वेग मी माझ्या मनाच्या अडथळ्यामुळे, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे न्यून करत आहे.’ हे दृश्य पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. त्यानंतर कितीही प्रसंग घडले, तरी ‘मागे न हटता श्री गुरूंना अपेक्षित असे मला घडायचे आहे’, अशा विचाराने मला प्रयत्न करता आले.
३. कृतज्ञता
माझे नाव मृण्मयी आहे. संस्कृत भाषेत ‘मृद्’ म्हणजे ‘माती’ आणि ‘मृण्मयी’ म्हणजे मातीची किंवा मातीपासून बनलेली. वरील दृश्य दिसल्यावर मला वाटले, ‘भगवंत मला आकार देत आहे. भगवंताच्या चरणी अखंड कृतज्ञ राहून भगवंताला अपेक्षित असे घडण्यासाठी मला तळमळीने प्रयत्न करायचे आहेत.’
– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|