‘मुंबई येथील भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ९० वर्षे) हे सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आहेत. त्यांच्या समवेत पनवेल (जिल्हा रायगड) येथील श्री. अनंत कुलकर्णी (वय ६८ वर्षे) हेही आले आहेत. भारताचार्य सु.ग. शेवडे आणि श्री. अनंत कुलकर्णी यांची ओळख अनेक वर्षांची आहे. श्री. कुलकर्णी हे चेंबूर (मुंबई) येथे नोकरीनिमित्त जात असत. तेव्हा त्यांच्या आस्थापनात भारताचार्य सु.ग. शेवडे यांची विविध विषयांवर व्याख्याने होत असत. त्या वेळी त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि तेव्हापासून त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे चालू झाले. श्री. कुलकर्णी हे भारताचार्य सु.ग. शेवडे यांना विविध प्रसंगी साहाय्य करतात. यातूनच जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी श्री. कुलकर्णी यांना मानसपुत्र मानले आहे.
भारताचार्य सु.ग. शेवडे रामनाथी आश्रमात आल्यावर मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला श्री. अनंत कुलकर्णी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. विनम्रता : भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे वय ९० वर्षे आहे. ‘त्यांना काही वस्तू देणे, त्यांना हवे-नको ते पहाणे, त्यांच्याशी कायमच आदर ठेवून बोलणे’, या कृती करतांना श्री. कुलकर्णी यांचे वागणे विनम्रतेचे असते.
२. जिज्ञासा : भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडे हिंदु धर्माविषयी अगाध आणि विपुल ज्ञान आहे. श्री. कुलकर्णी हे भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या समवेत रहात असतांना त्यांना धर्माच्या अनुषंगाने विविध शंका जिज्ञासेने विचारून स्वतःचे ज्ञान वृद्धींगत करत आहेत.
३. ते प्रत्येक कृती भारताचार्य सु.ग. शेवडे यांना विचारूनच करतात.
४. ते नामजपादी साधना करण्याचा प्रयत्न करत आहेत.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्यावर श्री. अनंत कुलकर्णी यांची नितांत श्रद्धा आहे.’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२४)