श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण
पोलीस अधीक्षक सचिन पाटील करणार अन्वेषण !
छत्रपती संभाजीनगर – श्री तुळजाभवानीदेवी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांच्या दानपेटी घोटाळ्याच्या प्रकरणी राज्य सरकारने गुन्हा नोंद करण्यासाठी अनुमती दिली आहे. या संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने लेखी पत्र देत हे आदेश पारीत केले आहेत. या संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक सुभाष निकम यांनी तक्रार देऊन तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४०९ यांतर्गत गुन्हा नोंद करावा आणि या गुन्ह्याचे अन्वेषण संभाजीनगर विभागाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी करावे, असे आदेश अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी दिले आहेत.
या प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या पुणे विभागाने तत्कालीन ४२ अधिकारी-कर्मचारी यांच्यावर घोटाळ्याचा आरोप ठेवला आहे. यात ९ उपविभागीय अधिकारी, ९ तहसीलदार, १० ठेकेदार आणि १४ मंदिर कर्मचारी यांचा समावेश आहे. ११ वरिष्ठ ‘आय.ए.एस्.’ अधिकार्यांच्या विभागीय चौकशीचीही शिफारस करण्यात आली आहे, तसेच मंदिराचे विश्वस्त असलेले ८ माजी नगराध्यक्ष आणि तत्कालीन आमदार यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप ठेवला आहे.
हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी दिला होता लढा !
या संदर्भात १७ मे या दिवशी धाराशिव येथे हिंदु जनजागृती समितीने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी दोषी असलेल्या प्रत्येकावर समयमर्यादा घालून फौजदारी गुन्हे प्रविष्ट करावेत, अशी मागणी केली होती. या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. किशोर गंगणे, अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे उपस्थित होते. हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी दिलेला न्यायालयीन लढा अन् केलेला पाठपुरावा यांमुळेच गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत.