लिंगनूर (जिल्हा सांगली) येथील मठाचा रथोत्सव उत्साही वातावरणात पार पडला !

मिरज, २० मे (वार्ता.) – मिरज पूर्व भागातील लिंगनूर येथे श्री सद्गुरु गणेश्वर अवधूत महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन मठात श्री सद्गुरु देवांच्या २३ व्या आगमन महोत्सवानिमित्त १७ मे या दिवशी रथोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. शोभायात्रेत सहस्रोंच्या संख्येने महिलांचा सहभाग होता. विविध प्रातांतील साधू-संतांची वंदनीय उपस्थिती होती.

लिंगनूर येथे १६ मेपासून आगमन महोत्सव मठाधिपती श्रीधामजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. धनगरी ढोल आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सव अन् शोभायात्रा काढण्यात आली. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले. महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. श्री सद्गुरूंच्या चरण पादुकांची पूजा करण्यात आली. शरणाप्पा स्वामीजी, सुवर्णा माताजी, निर्मला माताजी, लक्ष्मी माताजी रथोत्सवाच्या वेळी उपस्थित होत्या. १७ मे या दिवशी पहाटे महारुद्राभिषेक, होम आणि दुपारी भजन, कीर्तन आणि मठाधिपती श्रीधामजी महाराजांचे प्रवचन झाले. सायंकाळी रथोत्सव आणि शोभायात्रा झाली.

तिसर्‍या म्हणजे १८ मे या दिवशी पहाटे महाअभिषेक आणि होम, दिवसभर भजन आणि कीर्तन, महाप्रसाद आणि सायंकाळी आध्यात्मिक प्रबोधनांचे प्रवचन झाले. महाराष्ट्रासह कर्नाटकातील सहस्रो भाविक लिंगनूर मठात आवर्जून उपस्थित होते. बेळंकी मठातील शिवलिंग शिवाचार्य महाराज, म्हैसाळ मठातील शिवलिंग शिवाचार्यजी, धारेश्वरचे नीलकंठ महाराज, हिंगणगावचे महादेव महाराज, देशिंग मठाचे आनंद गिरी महाराज, घोरपडीचे गणेश आनंदी गिरी महाराज यांच्या उपस्थितीत आगमन सोहळा झाला.