US Students And Hindu Curriculum : अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

२ विद्यापिठांची ८० शहरांमध्ये केंद्रे

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत भारतीय संस्कृतीची विश्‍वासार्हता आणि लोकप्रियता वाढत आहे. अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे. वर्ष २०१४ मध्ये या २ विद्यापिठांमध्ये ३ सहस्र ६९९ विद्यार्थ्यांची नोंदणी होती, जी वर्ष २०२४ मध्ये वाढून १४ सहस्र २९६ झाली आहे. त्यांपैकी यंदा ४० टक्के, म्हणजे ५ सहस्र ९७० विद्यार्थी श्‍वेतवर्णीय आहेत. अमेरिकेत स्थायिक भारतियांच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या पिढीतील मुले हिंदु अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेत आहेत.

१. हार्वर्ड, येल, एम्.आय.टी., ब्राऊन आणि कोलंबिया यांसारख्या विद्यापिठांमध्येही २ वर्षांपूर्वी हिंदु अभ्यासक्रम चालू झाले आहेत. यात संस्कृत, श्रीमद्भगवद्गीता, हिंदु संस्कृतीचा इतिहास आणि हिंदु ग्रंथ या ४ वर्षांच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या दोन्ही विद्यापिठांची अमेरिकेतील ५० राज्यांतील ८० शहरांमध्ये केंद्रेही आहेत. यांत अनुमाने १५ सहस्र शिक्षक वर्षभर कार्यशाळाही घेतात. धर्म नागरिकीकरण फाऊंंडेशनने या सत्रासाठी दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि क्लेरेमाँट लिंकन विद्यापिठासह २ संशोधन केंद्रे चालू केली आहेत.

२. दक्षिण कोलंबिया विद्यापिठाचे अध्यक्ष मॅक्स निकियास यांच्या मते, पुढील सत्रापासून चीन आणि जपान या देशांमधील विद्यार्थ्यांचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे. हिंदु अभ्यासक्रमामध्ये पदवी आणि पी.एच्.डी. प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी युरोप अन् आशिया येथे शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरीसाठी जातात.

संपादकीय भूमिका

अमेरिकेत आणि अन्य विदेशी विद्यापिठांमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभ्यासक्रम शिकवण्यात येऊ लागल्यानंतर आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर भारतातील विद्यापिठे जागे होतील आणि असा अभ्यासक्रम शिकवू लागतील !