बीड – येथे ‘जिजाऊ मल्टीस्टेट’च्या घोटाळ्यात एका व्यापार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार हरिभाऊ खाडे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांनी १ कोटी ८ लाख रुपये रोख, सोन्याची बिस्कीटे, दागिने असा ७२ लाख रुपयांचा ऐवज, तसेच ४ लाख ६२ सहस्र रुपयांची चांदी मिळाली. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
बीड येथील ‘जिजाऊ मल्टीस्टेट’मध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात एका व्यापार्याच्या खात्यावर ६० लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती, तसेच दुसर्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार ३० लाख रुपये देण्याचे ठरले. त्यातील ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेतांना व्यापार्यास अटक करण्यात आली. हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव हे फरार आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयाच्या आदेशानुसार हरिभाऊ खाडे यांच्या घराची झडती घेतली होती.
संपादकीय भूमिका :पोलीस खात्यात असे पोलीस असतील, तर कधीतरी देश भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशांना कठोर शिक्षाच हवी ! |