‘छायाचित्रमय जीवनदर्शन पुस्तिका भाग १’ या ग्रंथावरील सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाचे मुखपृष्ठ

१. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव अल्प पडत असल्याचे जाणवणे आणि त्यांना सूक्ष्मातून अनुभवण्यास न येणे

‘माझ्याकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ‘छायाचित्रमय जीवनदर्शन पुस्तिका भाग १’ आहे. मला या पुस्तिकेच्या (ग्रंथाच्या) मुखपृष्ठावरील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे (प.पू. गुरुदेवांचे) छायाचित्र पुष्कळ आवडते. ‘प.पू. गुरुदेव माझ्याकडे पहात आहेत आणि त्यांचे माझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष आहे’, असा भाव ठेवण्यास मी पुष्कळ न्यून पडत होते. प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवणे मला जमत नव्हते.

२. कायद्याच्या पदवीपरीक्षेचा अभ्यास साधनेच्या स्तरावर न होता यांत्रिक पद्धतीने होणे आणि त्यामुळे नकारात्मक विचार येऊन ताण येणे

एप्रिल २०२३ मध्ये माझी कायद्याच्या पदवीची (वकिलीची) परीक्षा चालू होणार होती. त्यासाठी मी फेब्रुवारी मासापासून परीक्षेची सिद्धता आणि उजळणी करण्यास आरंभ केला; परंतु काही वेळा माझा अभ्यास नीट होत नव्हता. मला अभ्यास करतांना सातत्याने नकारात्मक विचार येण्यासह ताणही येत होता. मला प.पू. गुरुदेवांना अनुभवता येत नव्हते, तसेच माझा अभ्यास साधनेच्या स्तरावर न होता यांत्रिक पद्धतीने होत असल्याचे मला जाणवत होते. मला त्या अभ्यासातून आनंद मिळत नव्हता.

३. ‘छायाचित्रमय जीवनदर्शन पुस्तिका भाग १’ हा ग्रंथ समोर ठेवून अभ्यासाला आरंभ केल्यावर अभ्यास चांगला होणे आणि परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवता येऊन साधनेच्या स्तरावर चांगले प्रयत्न होणे

कु. दिव्या शिंत्रे

त्यानंतर मी प.पू. गुरुदेवांच्या संदर्भातील ‘छायाचित्रमय जीवनदर्शन पुस्तिका भाग १’ हा ग्रंथ समोर ठेवून अभ्यास करायला आरंभ केला. तेव्हा अभ्यास करतांना ‘माझ्या समोर प.पू. गुरुदेव बसले आहेत आणि ते मला अभ्यासातील संकल्पना समजावून सांगत आहेत’, असे मला जाणवू लागले. परीक्षेचा ताण येऊ नये; म्हणून मी ‘अ ३’ नुसार स्वयंसूचना (टीप) सत्र करत होते. मी अभ्यास करत असतांना प.पू. गुरुदेव ‘दिव्या, सत्र कर’, अशी मला सूक्ष्मातून हाक मारून स्वयंसूचना सत्र करण्याची आठवण करून देत असल्याचे मला जाणवत होते. माझ्याकडून ‘प्रार्थना, कृतज्ञता, शरिरावर आलेले अनिष्ट शक्तींचे आवरण काढणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे इत्यादी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना?’, याकडे प.पू. गुरुदेवांचे बारकाईने लक्ष आहे आणि तेच माझ्याकडून प्रयत्न करवून घेत आहेत’, असे मला सारखे जाणवत होते. माझ्याकडून त्यांना सतत आत्मनिवेदन होत होते.

(टीप : स्वतःतील स्वभावदोषांवर मात करण्यासाठी मनाला स्वयंसूचना देऊन स्वभावदोष न्यून करण्याची पद्धत. अ ३ या पद्धतीनुसार प्रसंगाचा सराव करून मनाला सूचना देण्यात येते.)

४. साधनेच्या स्तरावर प्रयत्न चालू केल्यावर परीक्षेच्या पूर्वी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन पुस्तिका’ या ग्रंथावरील प.पू. गुरुदेवांच्या छायाचित्रातील चेहर्‍याचे रंग पालटणे,’ असे साधकांनाही जाणवणे आणि छायाचित्र जिवंत झाल्याचे जाणवणे

परीक्षा जसजशी जवळ येत होती, तसतसे जीवनदर्शन ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील प.पू. गुरुदेवांच्या चेहर्‍यात पालट होत असल्याचे माझ्या लक्षात आले. छायाचित्रातील प.पू. गुरुदेवांचा चेहरा कधी गुलाबी, कधी पिवळा, तर कधी लाल रंगाचा झालेला दिसायचा, तसेच ते छायाचित्रही आता जिवंत झाले आहे’, असे मला वाटत आहे. मी हा ग्रंथ काही साधकांना दाखवला. तेव्हा त्यांनाही हा पालट जाणवला.

५. ‘परीक्षेच्या कालावधीत अनेक सेवांमध्ये सहभाग असूनही चांगले गुण मिळणे आणि ‘सेवेसाठी अन् देवासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नसून त्यातून देव साधनाच करून घेतो आणि आनंद देतो’, हे अनुभवायला मिळणे

परीक्षेच्या कालावधीत माझा अनेक सेवांमध्ये सहभाग असल्यामुळे परीक्षेचा अभ्यास होईल कि नाही ? अशी शंका माझ्या मनात येत होती; मात्र ग्रंथाच्या माध्यमातून गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवून अभ्यास केल्यानंतर मला परीक्षेत चांगले गुणही मिळाले. मी केलेल्या अभ्यासाच्या तुलनेत एवढे गुण मिळणे मला स्वतःलाही अपेक्षित नव्हते; पण केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला चांगले गुण मिळाले. ‘सेवेसाठी आणि देवासाठी दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. उलट त्यातूनही देव साधनाच करून घेतो आणि आनंद देतो’, हे मला अनुभवायला मिळाले. प.पू. गुरुदेवांनी त्यांच्या अस्तित्वाची साक्षच मला या माध्यमातून दिली.

६. प.पू. गुरुदेव प्रत्येक क्षणी समवेत असल्याचे अनुभवणे

‘आपण मारलेली प्रत्येक हाक प.पू. गुरुदेवांपर्यंत पोचते आणि ते प्रत्येक ठिकाणी अन् प्रत्येक क्षणी आपल्या समवेत असतात’, याची अनुभूतीच त्यांनी मला दिली. याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. दिव्या विजय शिंत्रे (वय २२ वर्षे), कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.८.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक