शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत असूनही साधना अन् गुरुकृपा यांमुळे मन स्थिर असल्याची साधकाला येत असलेली प्रचीती !

होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी

‘अनुमाने २० वर्षांपूर्वी माझ्याकडे दक्षिण भारतातील अध्यात्मप्रसाराच्या सेवेचे दायित्व होते. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटलो होतो. त्या वेळी ते मला त्यांना होत असलेल्या त्रासांविषयी सांगत असत, उदा. वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे गुडघ्यातील मांस झिजणे, गुडघे दुखणे इत्यादी. शेवटी ते मला म्हणायचे, ‘‘माझे मन मात्र आनंदात असते.’’

आता अनुमाने २० वर्षांनंतर मलाही परात्पर गुरु डॉक्टरांसारखे त्रास होत आहेत. माझे मन आनंदात नसले, तरी ते स्थिर झाले आहे. मला काही शारीरिक त्रास झाले, तरी माझे मन मात्र स्थिर असते. घरी अथवा नातेवाइकांकडे काही चांगले किंवा वाईट प्रसंग घडले, तरी माझे मन स्थिर असते, उदा. ५ – ६ वर्षांपूर्वी माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म होते. त्यासाठी मी बेंगळुरूला जायच्या एक दिवस आधी परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘उद्या तुमची ‘ओपन हार्ट सर्जरी’ आहे आणि तुम्ही इतक्या आनंदात कसे आहात ? जाण्याच्या आधी हे लिहून द्या.’’ तेव्हा मी म्हणालो, ‘‘आल्यावर लिहून देतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘नको. आत्ताच लिहून द्या आणि मग जा.’’ मीही ते लिहून देऊन मगच बेंगळुरूला गेलो. काही वर्षांची साधना आणि गुरुकृपा यांमुळे माझे मन स्थिर आणि आनंदात असते. ‘जीवनात सुख-दुःख असे काहीच नसते’, हे मला यातून शिकायला मिळाले.’

– डॉ. प्रकाश घाळी (वय ७५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक