सातारा, १४ मे (वार्ता.) – १ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सातारा येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात श्रीकृष्ण दामोदर पाथरे हे वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे अर्जदाराची वारसा हक्काने विश्वस्त बदलाची २ प्रकरणे प्रविष्ट आहेत. या प्रकरणाविषयी चौकशीची जाहीर नोटीस काढण्यासाठी पाथरे यांनी अर्जदाराकडे १ सहस्र रुपयांची लाच मागितली होती. याविषयी अर्जदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची सत्यता पडताळून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ मे या दिवशी घटनास्थळी सापळा रचला. या वेळी वरिष्ठ लिपिक श्रीकृष्ण पाथरे यांना १ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.
संपादकीय भूमिका :अशा लाचखोरांवर कठोर शिक्षा झाल्याविना इतरांवर जरब बसणार नाही ! |