- काही नाल्यांमधून रक्तमिश्रित पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा गंभीर आरोप !
- नाल्यांमधून इतक्या मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळत असतांना प्रदूषण मंडळाची मात्र डोळेझाक !
गेली अनेक वर्षे पंचगंगा नदी ही कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते, असे समोर आले आहे. या पहाणीच्या निमित्ताने प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोल्हापूर महापालिका प्रशासन, इचलकरंजी महापालिका प्रशासन हे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वर्षभर निष्क्रीयच दिसून आले. यातील कार्यालयांकडून प्रदूषण अल्प करण्याची केवळ वरवरची उपाययोजना करण्यात येत असून केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या पलीकडे काहीच होत नाही. नाल्यांमधील सांडपाणी, मैलामिश्रित पाणी आणि रक्तमिश्रित पाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतांना प्रशासकीय अधिकार्यांना मात्र त्याचे कोणतेच सुवेरसुतक नसल्याचे दिसून आले. |
कोल्हापूर – पंचगंगा नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात ‘प्रजासत्ताक’ संघटनेचे दिलीप देसाई यांच्या आवाहनानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार कोल्हापूर महापालिकेच्या अधिकार्यांनी जे नाले पंचगंगा नदीत मिसळतात, त्या संदर्भात संयुक्त पहाणी केली. या पहाणीत करवीरचे नायब तहसीलदार, कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त उपस्थित होते. या पहाणीत शहरात अनेक ठिकाणी जयंती नाल्यासह विविध नाल्यांमधील सांडपाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे समोर आले. यातील गंभीर गोष्ट म्हणजे अनेक नाल्यांमधील सांडपाणी हे मैलामिश्रित आणि काळे असून ते फेसाळलेले होते. काही नाल्यांमधील रक्तमिश्रित पाणी पंचगंगा मिसळत असल्याची तक्रार दिलीप देसाई यांनी अधिकार्यांकडे केली.
पंचगंगा नदी प्रदूषणाविषयी वर्ष १९९७ मध्ये उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानंतर एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ३ महिन्यांतून एकदा आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. या संदर्भात महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ हे गंभीर नव्हते. या पार्श्वभूमीवर दिलीप देसाई यांनी संयुक्त पहाणीची मागणी केली होती. १३ मे या दिवशी लेखी पत्र देऊनही महापालिकेचे कोणतेच अधिकारी पहाणीसाठी उपस्थित नव्हते. अधिकारी उपस्थित नसल्याने १४ मे या दिवशी होणार्या पहाणीसाठी महापालिकेच्या अधिकार्यांनी उपस्थित रहावे; म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळालो लेखी नोटीस काढावी लागली. (यावरून महापालिका प्रशासन खरोखरच प्रदूषण हटवण्यासाठी किती गंभीर आहे ? ते समोर येते ! प्रशासकीय अधिकार्यांनाच जर ‘प्रदूषण दूर व्हावे’, असे वाटत नसेल, तर त्यावर प्रत्यक्षात कृती कधी होणार ? अशा अधिकार्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ काही कारवाई करणार का ? – संपादक)
दिलीप देसाई यांनी पत्रकारांना संयुक्त पहाणीतील सांगितलेले काही निष्कर्ष पुढीलप्रमाणे…!
१. जयंती नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीत मिसळत असून त्यातून मोठ्या प्रमाणात नदीत कचरा मिसळत होता. हा कचरा नाल्याच्या काठावरच ठेवला होता. यामुळे हा कचरा पावसाळ्यात परत नदीत मिसळ्याची दाट शक्यता आहे. जयंती नाल्याचे उपसा करणारे ३ पंच चालू होते आणि बावडा येथील सांडपाणी शुद्धीकरण केंद्र चालू होते, असे असतांनाही नाल्यातील पाणी पंचगंगा नदीत मिसळत होते.
जयंती नाल्याच्या खालील बाजूस खानिवलकर पेट्रोलपंपाशेजारून येणारा नाला नदीत मिसळत होता, तसेच विश्वकर्मा सोसायटीच्या मागील बाजूने सांडपाणी मिसळत होते. छत्रपती कॉलनी येथील नाला हा राजाराम बंधार्याजवळ नदीत मिसळत होता. यात काळसर सांडपाणी आणि कचरा असल्याचे निदर्शनास आले.
२. बापट कँप नाल्यामधील पाणी पंपाच्या खालील बाजूने वहात असून ते पुढे नदीत मिसळत होते.
३. दुधाळी नाला पंचगंगा नदीत मिसळत होता.
४. नदीला मिसळणार्या सर्वच नाल्यांमध्ये कचरा होता आणि प्रामुख्याने प्लास्टिक असल्याचे आढळून आले. पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी जलपर्णी वाढल्याचे दिसून आले.
दुपारनंतर इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत पहाणी !
१४ मे या दिवशी सकाळी कोल्हापूर महापालिका क्षेत्रात पहाणी झाल्यावर दुपारी इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील अनेक ठिकाणी भेटी देऊन तेथील पहाणी करण्यात आली.
संपादकीय भूमिका :केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ? |