आज सद्गुरु श्री शंकर महाराज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
१. सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, ईर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल.
२. सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरूंमुळे प्राप्त होते; पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखाच्या मागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरूंना ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
३. गुरु आणि देव यांच्याविषयी उत्कट प्रेम अन् दृढ श्रद्धा हवी.
४. जे गुरूंना ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात, त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.
५. ‘देव सर्वव्यापी आहे’, असे लोक मानतात; पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा, तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल.
६. स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला साहाय्य, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो.
७. जे आत्मदर्शन प्राप्ती करून घेतात, त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.
८. सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ.
९. सद्गुणांची वाढ झाली, तर माणसात देवत्व प्रकट होते.
१०. आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म आहे तोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करून घ्या. जीवनाचे सार्थक करा.’
(‘श्री दत्त महाराज’ संकेतस्थळावरून साभार)