पनवेल येथील सनातनच्या हितचिंतक श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन (वय ७३ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन

वर्ष १९७६ पासून झोपेतून उठल्यावर ‘माझ्या मनात हनुमान चालिसा चालू आहे’, असे मला वाटायचे. आताही बोलतांना दुर्गा चालिसातील श्लोक माझ्या मनात चालू आहेत. अशा प्रकारे माझे देवाचे स्मरण सतत चालू असते. काही वेळा पूर्ण श्लोक, श्लोकांतील ओळी असे मनात चालू असते.

– श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन

श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन (उजवीकडे) यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना पू. (सौ.) अश्विनी पवार

देवद (पनवेल), १४ मे (वार्ता.) – समाजसेवेच्या माध्यमातून सर्वांना निःस्वार्थपणे साहाय्य करणार्‍या, प्रेमभाव आणि तत्त्वनिष्ठता यांचा अपूर्व संगम असणार्‍या, ईश्वरावर दृढ श्रद्धा अन् सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव, तसेच सतत आनंदी असणार्‍या पनवेल येथील सनातनच्या हितचिंतक श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन (वय ७३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. १३ मे २०२४ या दिवशी श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन या साधकांना भेटण्यासाठी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी झालेल्या अनौपचारिक सत्संगात सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. श्रीमती श्रीनिवासन यांच्याशी वार्तालाप करत असतांनाच पू. (सौ.) अश्विनीताईंनी हे आनंदवृत्त उलगडून सांगितले. या वेळी श्रीमती श्रीनिवासन यांच्यासह उपस्थित असलेल्या साधकांचीही भावजागृती झाली. उपस्थित साधकांनीही त्यांची गुणवैशिष्ट्ये या वेळी सांगितली. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र देऊन त्यांचा सत्कार केला.

श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन या वेळी म्हणाल्या, ‘‘माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे ऐकून मला आनंद झाला.’’

साधना अंतर्मनात रुजलेल्या आणि गुणांचा खजिना असलेल्या श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन ! – पू. (सौ.) अश्विनी पवार

अनौपचारिक सत्संगात श्रीमती श्रीनिवासन यांनी त्यांचा जीवनप्रवास सांगितला. तो ऐकल्यावर असे वाटते की, श्रीमती राजराजेश्वरी श्रीनिवासन म्हणजे गुणांचा खजिनाच आहेत. त्यांच्यात भक्तीभाव, निरपेक्ष कृती करणे, निर्मळता, चिकाटी, धैर्यशीलता, मनमोकळेपणा, इतरांना साहाय्य करणे, क्षात्रवृत्ती यांसह अनेक गुण आहेत. आत्मिक मनोबल आणि भगवंतावरील श्रद्धा यांमुळे अनेक प्रतिकूल प्रसंगांत स्थिर राहून त्यांनी त्यावर मात केली आहे. हे सर्व पाहून लक्षात येते की, श्रीमती श्रीनिवासन म्हणजे एक कर्मयोगी जीव आहे !

लहानपणापासून आई-वडिलांनी चांगले संस्कार केल्याने श्रीमती श्रीनिवासन या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीचे श्रेय पालकांना देतात. त्यांनी केलेले संस्कार रुजल्यामुळे श्रीनिवासन यांना साधना शिकावी किंवा कुणी शिकवावी लागली नाही.

त्यांचा ईश्वराप्रती भक्तीभाव आहे. त्यांचे देवाविषयीचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. साधना त्यांच्या अंतर्मनातच रुजली आहे. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याने त्यांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली. त्यांनी मनुष्यजन्माचे सार्थक केले.

श्रीमती श्रीनिवासन यांच्यातील भावस्थिती दर्शवणारे त्यांचे भावबोल !

१. डोळे मिटले की, मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेच दर्शन होते.

२. मला देवाचे कधीच विस्मरण होत नाही. तो माझ्या आतच आहे.

३. ‘मी आश्रमात आले नसून माझ्या माहेरी आले आहे’, असे मला वाटते.

४. देव माझ्या मागे नाही. माझ्या पुढे आहे. मला कोणताही त्रास झाला किंवा प्रतिकूल प्रसंग आला, तर मी देवाला सांगते, ‘आता तूच मला यातून बाहेर काढ.’

५. मी कधीच नकारात्मक विचार करत नाही. नेहमी सकारात्मक असते; कारण माझ्या अंतर्मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा वास आहे. त्यामुळे मन नेहमी स्वच्छ आणि निर्मळच असायला हवे.

६. एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांना भेटल्यामुळे मला माझी काशी आणि रामेश्वर यांची यात्रा पूर्ण झाल्याप्रमाणे वाटते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या भोवतीची प्रभावळ पुष्कळ मोठी आणि तेजस्वी होती. ती पाहूनच मी भारावून गेले !

७. मला संपूर्ण शरिरात कुठे ना कुठे काही शारीरिक समस्या आहेत, तरी त्याचे दु:ख वाटून न घेता ‘मी त्या अवयवांमुळे कार्यरत आहे’, याविषयी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आनंदी रहाते.

क्षणचित्रे

१. ‘श्रीमती श्रीनिवासन यांची निर्मळता आणि प्रांजळपणा यांमुळे त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे साधकांना वाटत होते.

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी त्या बोलत असतांना त्यांना भावाश्रू येत होते. त्यांच्यासह अन्य साधकांचीही भावजागृती होत होती.

३. श्रीमती श्रीनिवासन आश्रमात आल्यावर त्यांची आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वीच काही साधकांना त्यांना पाहून ‘त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असेल’, असे जाणवत होते.

४. त्यांचे वय ७३ वर्षे आहे; पण त्या सर्वांना सांगतांना ‘माझे वय ३७ वर्षे आहे’, असे सांगत होत्या. ‘अजून मला भरपूर काही करायचे आहे’, असेही त्या या वेळी म्हणाल्या. उतारवय असूनही त्यांचे हे बोलणे किंवा विचार ऐकून त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल, असाच वाटत होता.

५. आश्रमातील साधकांना भेटता आल्याने श्रीमती श्रीनिवासन यांना पुष्कळ आनंद झाला होता.

६. त्या नियमितपणे म्हणत असलेली स्तोत्रे, श्लोक यांतील काही भाग त्यांनी म्हणून दाखवला.