घाटकोपर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग उभारणार्‍या आस्थापनाचा संचालक भूमीगत !

घाटकोपर येथील कोसळेले लोखंडी होर्डिंग आणि भावेश भिंडे

मुंबई – १३ मे या दिवशी वादळी वार्‍यामुळे घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील अवाढव्य होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला, तर ७४ जण घायाळ झाले. हे होर्डिंग इगो मिडिया प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाचे असून अनधिकृतरित्या उभारण्यात आले असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. या दुर्घटनेनंतर या आस्थापनाचे संचालक भावेश भिंडे हा कुटुंबियांसह भूमीगत झाला आहे. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१३ मे या दिवशी मुंबईमध्ये वादळी वार्‍याचा वेग प्रतिघंटा ६० कि.मी. इतका होता. या वेगवान वार्‍यामुळे १२० चौरस फूट लांबी आणि रुंदी असलेला हा अवाढव्य लोखंडी होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली १०० हून अधिक नागरिक अडकले होते. हे होर्डिंग जगातील सर्वांत मोठे होर्डिंग असल्याचे पुढे आले आहे. भावेश भिंडे याच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग या प्रकरणी गुन्हा नोंद असून न्यायालयाने त्याला जामीन संमत केला आहे. वर्ष २००९ मध्ये भावेश भिंडे याने अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती. भावेश भिंडे याच्या विरोधात अनधिकृत होर्डिंग उभारल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ तक्रारी आणि गुन्हे नोंद असल्याचा प्रकारही पुढे आला आहे. असे असतांना भिंडे याच्यावर कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही ?

मुंबई महानगरपालिकेकडून अधिकाधिक ४० चौरस फूट लांबी आणि रूंदी पर्यंत होर्डिंग लावण्याला अनुमती देण्यात येते. तर मग १२० चौरस फूट लांबी-रूंदी असलेल्या होर्डिंग कसे काय उभारण्यात आले अन् त्यावर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग !

घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत आणि अवाढव्य होर्डिंग काढण्यास प्रारंभ केला आहे.

संपादकीय भूमिका

मोठमोठ्या होर्डिंगमुळे येणार्‍या अडचणींचा विचार दुर्घटना घडल्यावर केला जातो हे संतापजनक !