मुंबई-गोवा महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याचा कामात भ्रष्टाचार !

भ्रष्टाचार्‍यांची चौकशी न झाल्यास उपोषणाची सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांची प्रशासनाला चेतावणी


खेड – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत महामार्गाच्या दुभाजकावर झाडे लावण्याचा कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ‘हा  भ्रष्टाचार करणार्‍यांची चौकशी करावी; अन्यथा उपोषण करू’, अशी चेतावणी येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश पवार यांनी पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम उपविभाग रोहा-रायगड यांच्याकडून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध दुभाजकावर ४.५० मीटर एवढ्या अंतरामध्ये फुलझाडे, वेलवर्गीय झाडे, कार्बन शोषण करणारी झुडपे लावण्यात येत असल्याचे त्यांनी कळवले आहे.

२. मे. कशेडी परशुराम हायवे प्रा.लि. या ठेकेदाराशी या कामासाठी करारनामा केल्याचेही कळवले आहे. या करारनाम्याची प्रत त्यांनी दिली नाही. या कामासाठी ५७९.५० कोटी रुपये खर्चाची प्रावधान आल्याचे त्यांनी कळवले असले, तरी अद्याप कशेडी बोगदा ते परशुराम घाट या दरम्यान १० टक्के भागांतही दुभाजकावर फुलझाडे लावण्यात आल्याचे निदर्शनास येत नाही.

३. महामार्गाच्या मधोमध ४.५० मीटर एवढे अंतर समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र एवढे अंतर न सोडता अनेक ठिकाणी दुभाजक बनवण्यात आला आहे.

४. महामार्गाच्या मधोमध मातीऐवजी बुरुम, दगड, गोटे आणि इमारत अथवा अन्य रस्त्याचा मलबा टाकण्यात आल्याची गोष्ट उघड झाली आहे.

५. जी झाडे लावण्यात आली आहेत, असे सांगण्यात येते. त्या ठिकाणी झाडे नसून ‘भटक्या गुरांनी झाडे खाल्ली’, असे हास्यास्पद उत्तर संबंधित ठेकेदार देत आहे. याविषयी विभागाचे अधिकारीही उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहेत. कोट्यवधी रुपयांची तरतूद असूनही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

६. येथील जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश खेड आणि चिपळूण प्रांत, तसेच महामार्ग बांधकाम विभाग चिपळूण यांना दिले आहेत; मात्र अद्यापही यासंदर्भात चौकशी आणि कारवाई झाली नाही.

७. प्रशासकीय कारवाईला दिरंगाई होत असल्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत.