झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याची केली मागणी
नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिन मिळाल्यावरून आता झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही तशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांचे अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपिठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास स्वीकृती दर्शवली असून या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) १७ मेपर्यंत उत्तर मागितले आहे. सोरेन यांना ३१ जानेवारी २०२४ या दिवशी भूमी घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आली होती.
न्यायालयात असा झाला युक्तीवाद !
१. सोरेन सध्या झारखंडच्या रांची येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
२. अधिवक्ता कपिल सिब्बल म्हणाले की, सोरेन यांना निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन हवा आहे. यावर न्यायालयाने म्हटले की, ‘ईडी’चे म्हणणे ऐकल्याखेरीज सोरेन यांना अंतरिम जामीन देऊ शकत नाही.
३. न्यायालय म्हणाले की, २० मे या दिवशी या प्रकरणाची सुनावणी घेऊ. त्यावर सिब्बल यांनी तोपर्यंत निवडणूक समाप्त होईल, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
४. यावर न्यायालयाने ‘या आठवड्यात पुष्कळ काम आहे. अनेक प्रकरणे सूचीबद्ध आहेत’, असे म्हटले. ‘असे आहे, तर ही याचिका फेटाळून लावा. राज्यात निवडणुका संपून जातील,’ असे सिब्बल म्हणाले.
५. खंडपिठाने आरंभीला सुनावणी पुढे नेण्याविषयी सांगितले परंतु सिब्बल विनंतीवर ठाम राहिल्याने सर्वोच्च न्यायालय १७ मे या दिवशी सुनावणी घेण्यास सहमत झाले.
६. झारखंडमधील खुंटी, सिंहभूम, लोहरदगा आणि पलामू या ४ लोकसभा मतदारसंघांसाठी १३ मे या दिवशी मतदान झाले. २० मे, २५ मे आणि १ जून या दिवशी राज्यातील उर्वरित १० जागांवर मतदान होणार आहे.
संपादकीय भूमिकाम्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, तो असा ! |