पणजी, १३ मे (वार्ता.) : क्रिकेटवर सट्टेबाजीचा व्यवसाय करणार्यांना व्यवसायासाठी गोवा एक सुरक्षित स्थान वाटू लागले आहे. सध्या देशात लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीगचे (‘आय्.पी.एल्.’चे) क्रिकेट सामने चालू आहेत आणि या सामन्यांवरील सट्टेबाजीला ऊत आला आहे. गोवा पोलिसांनी मागील काही आठवड्यांमध्ये क्रिकेटवर सट्टेबाजी चाललेल्या ठिकाणांवर धाडी घालून आतापर्यंत सुमारे २५ व्यावसायिकांना (‘ऑपरेटर्स’ना) कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या काही ‘ऑपरेटर्स’ची जामिनावर सुटका होऊन ते पुन्हा नवीन स्थळी हाच व्यवसाय करत असतात. (या संदर्भातील कायदा कमकुवत असल्याने जामीन मिळतो कि पोलीस पुरेसे पुरावे गोळा करू शकत नाहीत ? – संपादक)
गोव्यात पोलिसांची वर्दळ अल्प असलेला एखादा बंगला किंवा हॉटेलची खोली सहजतेने भाडेपट्टीवर मिळू शकते आणि या ठिकाणी क्रिकेटवरील सट्टेबाजीचा व्यवसाय केल्यास पोलिसांना ते समजणार नाही, अशी सट्टेबाजीचा व्यवसाय करणार्यांची धारणा आहे. यामुळे सट्टेबाजी करणारे व्यावसायिक त्यांच्या व्यवसायासाठी गोवा हे स्थान निवडत असतात. पोलिसांच्या मते त्यांना क्रिकेटवर सट्टेबाजी चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते संबंधित ठिकाणी धाड घालून कारवाई करतात. गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ९ मे या दिवशी पेडणे येथे धाड घालून दोघांना कह्यात घेऊन दीड लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य कह्यात घेतले होते. गत मासात पर्वरी पोलिसांनी एका खासगी बंगल्यात, तसेच साळगाव पोलिसांनी त्यांच्या पोलीस हद्दीत एका ठिकाणी क्रिकेटवरील सट्टेबाजीवर कारवाई केली होती. क्रिकेटवर सट्टेबाजी करणारे व्यावसायिक प्रथम त्यांचे एक ॲप ग्राहकांना ‘शेअर’ करतात (भ्रमणभाषवर पाठवतात) आणि याद्वारे ग्राहकाला त्याचा ‘आय.डी.’ दिला जातो. या ‘ॲप’च्या माध्यमातून दोघांची पैशांची देवाणघेवाण चालू होते.