पुणे – येथील फडके हौद परिसरात भाजपच्या पदाधिकार्यांनी मतदान केंद्राच्या परिसरात काँग्रेसचे फलक असल्याने आक्षेप घेत रस्त्यावर आंदोलन केले. या वेळी भाजपचे नेते आणि स्थायी समितीचे माजी सभापती हेमंत रासने यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. चौकात बुथवर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा फलक लावण्यात आला होता. हा फलक लावून त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक हेमंत रासने यांनी केला आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करून धंगेकरांची उमेदवारी रहित करावी, अशी मागणी करत त्यांनी फडके हौद चौकात आंदोलन केले. जोपर्यंत उमेदवारी रहित होत नाही, तोपर्यंत या जागेवरून हालणार नसल्याचा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. काही काळ दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते; मात्र पोलिसांनी त्यांना शांत केले.