‘सद्गुरु गाडगीळकाका यांच्या सेवेत असणारे श्री. भूषण कुलकर्णी हे गावी जाणार असल्याने मला नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२३ या काळातील काही दिवस सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत स्वच्छता करायची सेवा मिळाली होती. तेव्हा मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत सेवेला गेल्यानंतर काही वेळातच स्वतःच्या भोवती आलेले काळे (त्रासदायक शक्तीचे) आवरण नष्ट होणे
सद्गुरु गाडगीळकाका यांच्या खोलीत गेल्यानंतर ‘जसे मेणबत्ती पेटवल्यानंतर तिचे मेण पाघळते’, तसे स्वतःच्या भोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण पाघळत असल्याचे मला जाणवले. काही वेळानंतर आवरण पुष्कळ अल्प झाल्याचे जाणवले. १ घंटा किंवा त्यापेक्षा अधिक काळ नामजप केल्यानंतर जसे आवरण जाऊन उत्साही वाटते, तसे तेथे काही मिनिटे थांबल्यावर जाणवत होते. मी जेवढे दिवस सेवेला जात होतो, तेवढे दिवस खोलीत गेल्यानंतर माझ्यावर आलेले आवरण नष्ट होत असल्याचे मला जाणवायचे.
२. सद्गुरु काकांच्या खोलीत ‘निर्गुण’ असा जप ऐकू येणे
सद्गुरु काकांच्या खोलीत सेवेला गेल्यानंतर पहिल्या दिवशी तेथे अत्यंत हळू आवाजात ‘निर्गुण’ असा जप ऐकू येऊ लागला. प्रथम ‘मला तेथे जप लावला आहे’, असे वाटले; पण प्रत्यक्षात जप लावला नव्हता.
३. बाहेर उकाडा असूनही सद्गुरु काकांच्या खोलीत थंडावा जाणवणे
बाहेरील वातावरण उष्ण असूनही काकांच्या खोलीत पुष्कळ थंडावा जाणवायचा. हा थंडावाही अत्यंत आल्हाददायक आणि उत्साहवर्धक असा जाणवायचा.
४. सद्गुरु काकांमध्ये शिवतत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवून त्यामुळेच त्यांच्या खोलीत ॐकार चालू असल्याचे जाणवणे
आणखी २ दिवसांनी काकांच्या खोलीत येणारा निर्गुण हा जप ऐकू न येता ॐकार ऐकू येऊ लागला. त्यानंतर प्रतिदिन तेथे ॐकार चालू असल्याचे जाणवले. तेव्हा ‘सद्गुरु काका मागील जन्मापासून शिवउपासक आहेत’, असा विचार मनात आला. ‘सद्गुरु काकांमधील शिवतत्त्वामुळे त्यांच्या खोलीतील शिवतत्त्व वाढले असून त्यामुळे तेथे ॐकार ऐकू येत आहे’, असा विचार तेव्हा देवाने सुचवला.’
– श्री. रोहित साळुंके (वय ४५ वर्षे), फोंडा, गोवा. (१०.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |