काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू केशव महाराज यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराचे दर्शन घेतल्यावर मंदिरात जाणवलेली सकारात्मक ऊर्जा, चांगली स्पंदने यांविषयीचे वर्णन करतांना ते भावुक झाले. दक्षिण आफ्रिकी खेळाडू जाँटी र्होड्स यांनीही श्रीराममंदिराला भेट दिल्यावर ‘हा अनुभव दीर्घकाळ लक्षात राहील’, असे मत व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जस्टिन लैंगर हेही श्रीराममंदिरात ध्यान करतांना दिसले होते. वरील सर्व घटना या हिंदु धर्माची महानता स्पष्ट करणार्या आहेत. हिंदु धर्म हा प्राचीन अन् पुरातन आहे. जगभरात अनेक ठिकाणी हिंदु संस्कृतीचे पुरावे देणार्या देवतांच्या मूर्ती, तसेच अन्य गोष्टी आढळतात. तेथील सकारात्मक स्पंदने, अभूतपूर्व कलाआविष्कार पाहून लोक आश्चर्यचकित होऊन जातात. जगभरात अनेक प्रेक्षणीय स्थळांना लोक भेट देऊन तेथील क्षणिक सुख अनुभवतात. त्यानंतर काही दिवस त्याच्या आठवणीत घालवतात आणि पुन्हा दैनंदिन आयुष्यातील सुख-दु:खाच्या प्रसंगात अडकून रहातात; परंतु धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर मात्र तेथे घेतलेली अनुभूती ही आनंददायी, प्रेरणादायी, उत्साहवर्धक अन् दीर्घकाळ स्मरणात रहाणारी असते; कारण तो केवळ अनुभव नसतो, तर अनुभूती असल्याने व्यक्ती निराशा झटकून पुष्कळ सकारात्मता अन् चैतन्याचा ठेवा घेऊन तेथून बाहेर पडते.
५०० वर्षांच्या प्रचंड संघर्षानंतर श्रीराममंदिर उभे राहिले आहे. पुष्कळ साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी त्याच्या उभारणीच्या लढ्यात बलीदान दिले आहे. त्यामुळे हिंदूंचे श्रद्धादैवत असणार्या मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांप्रती श्रद्धा असणार्या प्रत्येक हिंदूसाठी श्रीराममंदिर हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. जगभरातील ख्रिस्ती आणि इस्लामी पंथातील लोकांना त्यांच्या धर्माच्या प्रचारासाठी बळाचा वापर करावा लागतो. ते कपटाने फसवून, बळजोरीने धर्मांतर करून स्वत:चा धर्म वाढवतात; परंतु हिंदु धर्माकडे आणि हिंदु संस्कृतीकडे विदेशातील, तसेच अन्य पंथीय लोक आपोआप आकर्षित होतात. हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविषयी त्यांच्या चेहर्यावर दिसणारे कुतूहल आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर त्यांना मिळणारे समाधान अन् शांती यातून हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व पुन:पुन्हा सिद्ध होते. काळ पालटत चालला आहे. धर्मांधांची सततची आक्रमणे, स्त्रियांवरील अत्याचार, आतंकवादी आक्रमणे यांनी देश ग्रासलेला असतांना अन् अयोध्येत श्रीराममंदिराची स्थापना होईल कि नाही ? अशी स्थिती असतांना श्रीराममंदिराची स्थापना झाली. श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार कोट्यवधी हिंदूंना होता आले. त्याचप्रमाणे कालमाहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची, म्हणजेच रामराज्याची स्थापनाही होणार आहे. त्यासाठी आपण सर्व हिंदूंनी धर्माचे महत्त्व समजून घेणे, धर्माभिमान जागृत ठेवणे अन् धर्मासाठी संघटित होऊन कृतीशील होणे आवश्यक आहे !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, पनवेल.