पुणे येथील मुसलमान मौलानांचा एम्.आय.एम्.चे उमेदवार अनिस सुंडके यांना जाहीर पाठिंबा !

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

पुणे – ज्या काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे, त्यांनी बाबरी मशीद पाडणार्‍या कारसेवकांचा सन्मान केला आहे, तसेच काँग्रेसच्या उमेदवाराने वक्फ बोर्डाच्या भूमीवर अवैध ताबा मिळवून त्यावर बांधकाम चालू केले; मात्र आम्ही सर्व मुसलमान बांधव एम्.आय.एम्.चे अनिस सुंडके यांच्या पाठीशी उभे रहाणार आहोत आणि त्यांनाच मतदान करण्याचे आवाहन आम्ही मुसलमान बांधवांना करणार आहोत; कारण वक्फ बोर्डाच्या जागेची माहिती मिळताच सुंडकेसाहेबांनी त्याची शहानिशा करून त्यावर कायदेशीररित्या ‘स्टे’ आणला, असे मत पत्रकार परिषदेत मौलानांनी मांडले. या वेळी मौलाना हैदर खान, मौलाना शकील शेख आदी उपस्थित होते.

उपस्थित मौलानांनी एम्.आय.एम्. पक्षाचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिस सुंडके यांना पाठिंबा घोषित केला आहे, तसेच त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. निवडणुका घोषित झाल्यापासून पुण्यातील विविध मशिदींमधील सदस्यांकडून विविध मुसलमानांना धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतील मशिदींमधून हिंदुत्वाच्या विरोधात फतवा काढला जात आहे. पुण्यातील धर्मगुरूंनी यावर आक्षेप घेतला आहे. मशिदींमधून याप्रकारे कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करणे चुकीचे आहे. ‘मतदारांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावे’, असे आवाहन करण्यास हरकत नाही; मात्र कोणत्याही विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला धार्मिक स्थळांच्या वतीने आवाहन करणे चुकीचे आहे, असे मत मौलानांनी मांडले. (याविषयी मौलाना मशिदींचे प्रबोधन करणार का ? – संपादक)