पुणे येथे पी.एम्.पी.एम्.एल्.च्या गाड्या प्रवासी मार्गांवर बंद पडत असल्याने प्रवाशांना त्रास !

नवीन इ-बस अद्यापही मिळालेल्या नाहीत

समयमर्यादा संपलेल्या गाड्या रस्त्यावर करत आहेत वाहतूक

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पी.एम्.पी.एम्.एल्.) अडीच वर्षांपूर्वीच आलेल्या १७७ इ-बस अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पी.एम्.पी.एम्.एल्.च्या जुन्याच गाड्या रस्त्यावर सोडल्या जात आहेत. त्या पुष्कळ जुन्या झाल्यामुळे मार्गांवरच बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पी.एम्.पी.एम्.एल्.कडून प्रतिदिन १ सहस्र ६०० गाड्या मार्गांवर प्रवासी वाहतूक करतात. महामंडळातील १२ वर्षे पूर्ण होत असलेल्या ठेकेदारांकडील २६६ गाड्या अल्प केल्या जात आहेत, तसेच महामंडळाच्या मालकीच्या ३२७ गाड्यांना १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ठेकेदारांकडून नव्या इ-बस अजूनही आल्या नसल्याने जुन्या गाड्या मार्गांवर सोडल्या जातात. त्या जुन्या असल्याने प्रतिदिन ५० तरी गाड्या मार्गांवर बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास तर होतोच पण महामंडळालाही आर्थिक हानी सहन करावी लागत आहे.

पी.एम्.पी.एम्.एल्.कडे टप्प्याटप्प्याने ६५० नवीन इ-बस येणार होत्या. त्यासाठी अनेक आस्थापनांसमवेत महामंडळाने करार केले आहेत. या सर्व गाड्या वर्ष २०२१ पर्यंत येणार होत्या. आतापर्यंत ४७३ इ-बस रस्त्यावर प्रवासी वाहतूक करत आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे अजूनही १७७ इ-बस प्रशासनाकडे आलेल्या नाहीत.