नवी देहली – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी मध्यपूर्वेतील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले की, भारत पॅलेस्टिनींसाठी एका राष्ट्राचे समर्थन करतो आणि भारताची ही भूमिका संपूर्ण जगाला ठाऊक आहे. ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये ‘विश्वबंधू भारत’ विषयावर बोलत होते.
जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबर या दिवशी जेव्हा आतंकवाद्यांनी इस्रायलवर आक्रमण केले, तेव्हा भारताला अगदी स्पष्ट होते की, हे आतंकवादी आक्रमण आहे ! जेव्हा इस्रायलने प्रत्युत्तर दिले, तेव्हाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली की, जेथे सैनिकी कारवाई होते, तेथे सामान्य जनतेचे प्राण वाचवणे अत्यंत आवश्यक असते. भारताने एकूणच मध्यपूर्वेतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती.
जयशंकर पुढे म्हणाले की, भारतानेही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लाल समुद्रातील नौकांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारताने लाल समुद्रात २० नौका तैनात केल्या आहेत. लाल समुद्रात हुथी बंडखोरांनी केलेल्या आक्रमणांमुळे व्यापार विस्कळीत झाला आहे.