वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच अक्षय्य तृतीया (१०.५.२०२४) या दिवशी सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी त्यांची जाऊ सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
सौ. ज्योती सुदिन ढवळीकर यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती
‘सौ. ज्योती सतत शिकण्याच्या स्थितीत असते. ती व्यावहारिक, कौटुंबिक, राजकीय किंवा साधनेसंदर्भातील प्रत्येक कृती किंवा प्रसंग यांमागची कारणमीमांसा आणि बारकावे जाणून घेते. प्रत्येक कृती चांगली आणि देवाला अपेक्षित अशी होण्यासाठी ‘त्यात काय पालट करणे आवश्यक आहे ?’, याचा ती अभ्यास करून तशी कृती करते. राजकारणातही ती आवश्यक आहे, तिथे उत्कंठापूर्वक त्याविषयी ती जाणून घेते. ज्योती दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचनही अभ्यासपूर्ण करते. त्यातील सूचना किंवा लेख यांविषयी मला काही समजले नसेल किंवा शंका असतील, तर मला त्याविषयी समजावून सांगते.
२. नियोजनकौशल्य
घरी एखादा मोठा कार्यक्रम किंवा धार्मिक कार्य असेल, तर ज्योती पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र बोलावून सर्वांशी चर्चा करते आणि कार्यक्रमातील सेवांचे दायित्व वाटून देते. त्यामुळे त्या कार्याचा कुणालाही ताण येत नाही आणि कार्यही व्यवस्थित पार पडते. तिच्या प्रेमभावामुळेच सगळे एकत्र येतात.
३. इतरांचे साहाय्य घेणे
एखादी मोठी दायित्वाची सेवा असेल, तर ज्योती ती शांतपणे आणि स्थिर राहून पार पाडते. एखाद्या वेळी तिला सेवेचा ताण आलाच, तर ती लगेच इतरांशी बोलून घेते. त्यामुळे तिला इतरांचे साहाय्य मिळून तिचा ताण लगेच हलका होतो.
४. परेच्छेने वागणे
‘परेच्छेने वागल्यामुळे साधना चांगली होते’, असे ती सांगते आणि अनुभवतेही, उदा. घरात कुणीही तिला एखादी गोष्ट करायला सांगितली किंवा एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन केले अन् ते तिच्या मनाविरुद्ध असेल, तरीही ती ते परेच्छा म्हणून स्वीकारते आणि त्यासंबंधी कृती करतांनाही प्रत्येक कृती परिपूर्ण अन् चांगलीच करते. तेव्हा ती ‘मला हे पटत नाही, मला आवडत नाही’, असे अजिबात जाणवू देत नाही किंवा तसे बोलत नाही. ती मला म्हणते, ‘‘असे परेच्छेने वागण्यातूनच आपली साधना होते. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) घरीच आपल्याकडून स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करून घेत आहेत.’’ यासाठी ती गुरुचरणी कृतज्ञताभावात रहाते.
५. दृढ श्रद्धेमुळे आलेली स्थिरता !
५ अ. कुठल्याही प्रसंगात भांबावून न जाता ‘गुरुकृपेने सर्व चांगलेच होणार’, अशा श्रद्धेने स्थिर असणे : ज्योतीची गुरुदेवांवर अचल श्रद्धा आहे. मी तिच्या चेहर्यावर कधीही भीती पाहिली नाही. अकस्मात् झालेल्या एखाद्या दु:खद प्रसंगाविषयी तिला सांगितल्यावर ‘तिने एकदम प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा ती भांबावली’, असे कधीही होत नाही. त्या प्रसंगात ती ‘यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय उपाय करू शकतो ?’, असा विचार करते. ‘जे व्हायचे असेल, ते होईल आणि जे होणार, ते गुरुकृपेने चांगलेच होणार’, अशी तिची श्रद्धा आहे.
५ आ. छातीत कळा आल्यावर घाबरून न जाता ‘रुग्णालयात जावे लागेल’, या विचाराने स्वतःची बॅग भरणे : २ वर्षांपूर्वी एकदा रात्री तिच्या छातीत कळा येत होत्या. तिला हा त्रास बराच वेळ झाला; परंतु तिने कुणालाही उठवले नाही किंवा कुणाला काही सांगितले नाही. ‘रुग्णालयात जावे लागेल’, या विचाराने तिने त्याच स्थितीत स्वतःची बॅग भरून औषधे गोळा करून ठेवली. मी तिला विचारले, ‘‘तुला रात्री भीती वाटली नाही का ? राजसीचे (मुलीचे) विचार आले नाहीत का ? (२ मासांनी राजसीची प्रसुती होणार होती).’’ ती मला म्हणाली, ‘‘भीती अजिबात वाटली नाही; पण आता राजसीची प्रसुतीसाठीची बॅग भरायला हवी आणि बाकी सगळी सिद्धताही पूर्ण करायला हवी. आता आपत्काळ आहे, त्यामुळे मला किंवा कुणालाही काहीही होऊ शकते.’’
गुरुदेवांवरील श्रद्धेमुळेच ज्योती कुठल्याही प्रसंगात स्थिर राहू शकते. यामुळेच देव तिला ‘त्या क्षणी काय करायला हवे ?’, ते सुचवतो. आता तिला दोन नातवंडे (मुलीची मुले) असून त्यांची सेवाही ती आनंदाने करते. अर्थात् ‘तिचे सगळे नियोजन जणू देवच करतो’, असे पुष्कळ वेळा माझ्या लक्षात येते. ‘तिचे सगळे सहजासहजी होऊन जाते’, ही तिच्यावर असलेली गुरुदेवांची कृपाच आहे.
६. साक्षीभाव
६ अ. प्रसंग घडल्यावर त्यावर स्वयंसूचना देऊन किंवा प्रार्थना करून त्यातून त्वरित बाहेर पडणे आणि स्वतःच्या साधनेवर त्याचा परिणाम होऊ न देणे : साक्षीभाव हा तर तिचा स्थायीभावच आहे. तिच्या स्वतःविषयी, कौटुंबिक किंवा इतर कुणाविषयी कुठलाही प्रसंग घडला, कुणी काही बोलले, चुकीचे वागले, तर ती त्याकडे साक्षीभावाने बघते. ‘प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार वागतो’, अशा विचाराने ती त्याकडे साक्षीभावाने बघते आणि लगेच तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करते. ‘तो प्रसंग मनात खोलवर गेला आहे’, असे तिला जाणवले, तर ती स्वयंसूचना घेऊन किंवा प्रार्थना करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. स्वतःचे बोलणे-वागणे किंवा साधना यांवर त्याचा परिणाम होऊ देत नाही.
६ आ. प्रत्येक प्रसंग प्रारब्धानुसार घडत असल्यामुळे ‘त्यात न अडकता शक्य होईल, तेवढे साहाय्य करायचे’, असा भाव असणे : ती भावनेऐवजी भावाला अधिक महत्त्व देते. त्यामुळे ‘कुणाविषयी काही वाईट ऐकल्यावर किंवा बघितल्यावर तिला पुष्कळ हळहळ वाटली, रडू आले किंवा ती त्यात अडकली’, असे होत नाही. ती म्हणते, ‘प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार सगळे घडत असते. आपल्याला शक्य होईल, तेवढे प्रयत्न करायचे, शक्य होईल, तेवढे साहाय्य करायचे; कारण सर्व देवाच्या हातात असते.’ प्रत्येक प्रसंगी ती गुरुदेवांनी दिलेल्या दृष्टीकोनाचा पुरेपूर वापर करते.
सौ. ज्योती ढवळीकर यांच्या सासरची आणि माहेरची कुलदेवता श्री विजयादुर्गा असणे आणि त्यांच्या सूनेचीही सासरची आणि माहेरची कुलदेवता श्री विजयादुर्गाच असणे
‘आमची ढवळीकर कुटुंबियांची कुलदेवी श्री विजयादुर्गा आहे. ज्योतीच्या माहेरची कुलदेवीही श्री विजयादुर्गा आहे आणि आता ज्योतीच्या सुनेचीही माहेरची अन् सासरची कुलदेवी श्री विजयादुर्गा आहे. अर्थात् ही केवळ गुरुकृपाच आहे. कुलदेवीचीही तिच्यावर भरभरून कृपा आहे.’
– सौ. लता दीपक ढवळीकर, फोंडा, गोवा.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अपार भाव असणे
ज्योतीच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. ‘गुरुदेव आपल्यासाठी पुष्कळ काही करतात; परंतु आपणच पुष्कळ अल्प पडतो’, असा तिचा विचार असतो. साधनेसंदर्भात, कौटुंबिक यांविषयी जे घडते, त्यासाठी तिच्या मनात नेहमी कृतज्ञतेचाच भाव असतो.
७ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी पितळ्याची घंटा हवी’, असा निरोप आल्यावर कुठलाही विचार न करता, लगेच ती पाठवून देणारी ज्योती ! : एकदा ‘गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्यासाठी पितळ्याची घंटा हवी आहे’, असा मला निरोप आला. तेव्हा ज्योती तिच्या माहेरी (खांडेपार, गोवा येथे) गेली होती. आमच्या घरी देवघरात पितळ्याची घंटा लावलेली आहे. हा निरोप आल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘देवघरातील घंटा दिली, तर घरातील सगळे विचारणार ‘घंटा कुठे आहे ?’ ज्योती घरी आल्यावर तिने काही विचार न करता देवघरातील घंटा काढली आणि लगेच पाठवून दिली. यातून ‘गुरुदेवांना हवे असेल, तेव्हा काहीच विचार करायचा नाही’, असा तिचा भाव आणि तत्परता हे गुण मला शिकता आले. देवाच्या कृपेने तिला कुठलीही गोष्ट कठीण किंवा अशक्य वाटत नाही. मला कठीण वाटणारी एखादी गोष्ट ती सहजपणे पूर्ण करते.
७ आ. ‘यज्ञासाठी काही साहित्य हवे’, अशी सूचना आल्यावर लगेच त्याची कार्यवाही करणे : एक दिवस रात्री १० वाजता ‘यज्ञासाठी काही साहित्य पाहिजे’, अशी सूचना भ्रमणभाषवर आली होती. त्या दिवशी ज्योती घरी नव्हती. दुसर्या दिवशी सायंकाळी ती घरी आल्यावर तिने ‘२०० दुर्वा मुळांसकट पाठवू शकतो’, असे कळवले आणि लगेच त्या काढून पाठवल्याही ! ही सूचना मी वाचलीही नव्हती. या प्रसंगातून मला ‘तिची सेवेची तळमळ, तत्परता, सतर्कता, समयसूचकता, श्री गुरूंविषयीचा भाव’ हे गुण शिकता आले.
८. जाणवलेला पालट
८ अ. स्थिरता वाढणे : आधी ज्योतीला काही गोष्टींचा ताण येऊन तिची चिडचिड होत असे; परंतु जसजशी तिची साधना वाढत गेली, तसतशी तिची स्थिरता वाढली. या १ – २ वर्षात ती पूर्ण स्थिर आहे. कुठल्याही प्रसंगात तिच्या मनाची चलबिचल होत नाही किंवा ती अस्थिर होत नाही. तिच्या चेहर्यावर कधीही ताणतणाव दिसत नाही.
८ आ. ज्योतीचा चेहरा नेहमी आनंदी असतो.
८ इ. ज्योतीच्या चेहर्यावर तेज जाणवते.
९. कृतज्ञता
‘हे कृपाळू गुरुमाऊली, हे सगळे गुण केवळ गुरुकृपेनेच तिला लाभले आहेत. तिने चांगली साधना करून तिच्यातील गुणांची वृद्धी केली आहे. ‘अशी गुणसंपन्न जाऊ मला दिली आणि तुम्ही माझ्याकडून हे लिखाण करून घेतले’, यांसाठी मी आपल्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
आपली चरणसेविका,
– सौ. लता दीपक ढवळीकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), फोंडा, गोवा. (३.५.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |