१० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्त ब्राह्मण संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा !

कोल्हापूर – वैशाख शुक्ल तृतीया, म्हणजेच १० मे या दिवशी श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर येथील १६ ब्राह्मण संस्थांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम आणि शोभायात्रा यांचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता कात्यायनी येथील भगवान श्री परशुराम मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे, तसेच श्री महालक्ष्मी मंदिरातील दशावतार येथील भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीवर विधीवत् अभिषेक होणार आहे. दुपारी ४.३० वाजता न्यू हायस्कूल, पेटाळा येथून शोभायात्रा चालू होणार आहे. ही शोभायात्रा विविध मार्गांवर जाऊन गांधीमैदानमार्गे परत न्यू हायस्कूल येथे परत येणार आहे.

या शोभायात्रेत झांज पथक, वारकरी संप्रदाय, टाळकरी, महिला लेझीम पथक, ब्राह्मण समाजातील संत-महात्मे, क्रांतीकारक, खेळाडू, इतिहासकार, छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्रीराम-सीता लक्ष्मण, वानरसेना, श्री रामदासस्वामी, अशा विविध व्यक्तींची सजीव भूमिका असणारे चित्ररथ आहेत. सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी भगवान परशुराम यांचा पाळणा, पाळणा, आरती, सुंठवडा वाटप आणि महाप्रसाद होईल. हा सोहळा ‘डॉल्बीमुक्त’ आणि प्रदूषण विरहित करण्याचे ठरवले आहे. तरी या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष श्री. संतोष कडोलीकर, कार्यवाह श्री. श्रीकांत लिमये, कोल्हापूर चित्पावन संघाचे अध्यक्ष श्री. मकरंद करंदीकर, तसेच विविध संघटनांचे प्रमुख यांनी केले आहे.