Kerala Fake Aadhaar card:केरळमध्ये बनावट आधारकार्डच्या जोरावर ५० सहस्र घुसखोरांचे वास्तव्य !

  • सैन्याच्या गुप्तचर विभागाने दिली माहिती

  • बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका येथून आले घुसखोर !

कोची (केरळ) – बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका येथील ५० सहस्र घुसखोर बनावट आधार कार्डांच्या जोरावर केरळमध्ये वास्तव्यास असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सैन्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने ही माहिती समोर आल्याचे केरळचे ‘ऑन मनोरमा’ या इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने सांगितले.

१. आधारकार्ड बनवण्याच्या सरकारी केंद्रांतील लोकांच्या माध्यमातून हे केले जात आहे. यात आसाममधील मधुपूर आणि नागाव, बंगालमधील कलीमपोंग, नदिया अन् उत्तर दिनाजपूर, तसेच केरळच्या पेरूंबावूर येथील आधार कार्ड प्रदान करणार्‍या केंद्रांद्वारे ही बनावट आधारकार्ड बनवून घेतल्याचे सैन्याच्या गुप्तचर विभागाने म्हटले.

२. ही माहिती समोर आल्यानंतर सीमा सुरक्षा दल आणि अन्य संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या असून समुद्रालगत असलेल्या राज्यांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे.

३. केरळमध्ये सध्या असलेली काही आधारकार्ड केंद्रे झारखंड आणि बंगाल येथून चालवली केली जात आहेत. केरळमधील मलप्पुरम्मध्ये असेच एक प्रकरण उघडकीस आले आहे, जेथे बंगालमधून आधारकार्ड केंद्र चालवले जात होते.

४. याआधीही रोहिंग्या घुसखोर हे मृतांची ओळख वापरून बांगलादेश सीमेवरून भारतात घुसत असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यांच्याकडे मृतांच्या नावाने बनवलेले ओळखपत्र मिळत होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेनेही या प्रकरणाचा तपास केला होता. याप्रकरणी तामिळनाडूत काही जणांना अटकही करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

अशा घटनांतून भारतात फोफावलेल्या भ्रष्टाचाराच्या व्याप्तीची कल्पना येते. घुसखोर भारतात आल्यानंतर त्यांच्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणार्‍या भारतातील टोळ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना आजन्म कारागृहातच धाडले पाहिजे !