साधिकेने कठीण प्रसंगांत अनुभवलेली गुरुदेवांची कृपा आणि साधनेच्या संदर्भात तिचे झालेले चिंतन !

सौ. संस्कृती सागवेकर

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा स्थुलातून सत्संग मिळावा’, असे वाटणे, ते साधकांच्या माध्यमातून भेटत असल्याची जाणीव होणे आणि ‘स्थुलातून त्यांची प्रत्यक्ष भेट व्हावी’, हा विचार नष्ट होणे

‘गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) मला स्थुलातून सत्संग मिळावा’, असे वाटायचे. माझ्या मनात ज्या वेळी असा विचार यायचा, त्या वेळी साधक माझ्याकडे येऊन ‘गुरुदेव किंवा साधना’ यांविषयी सांगायचे, तसेच मला भ्रमणभाषवर साधनेविषयी संदेश यायचा. त्यामुळे मला त्या दिवशी ‘गुरुदेव सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असे सतत वाटायचे. त्यानंतर याविषयी चिंतन केल्यावर ‘मला साधकाच्या माध्यमातून, म्हणजे समष्टीतून गुरुदेव भेटत आहेत’, या विचाराने मला फार आनंद व्हायचा. कालांतराने ‘गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटायला हवे’, हा माझ्या मनातील विचार केव्हा नष्ट झाला ?’, हे मला कळलेच नाही.

२. वैयक्तिक जीवनात संघर्षमय प्रसंग घडल्यावर अनुभवलेली गुरुकृपा !

२ अ. आश्रमात रहात असल्यामुळे प्रसंगांचा मनावर अत्यल्प परिणाम होणे : एका मासात माझ्या वैयक्तिक जीवनात ३ संघर्षमय प्रसंग लागोपाठ घडले. मी नातेवाइकांच्या समवेत किंवा घरी असते, तर या प्रसंगांचा त्रास होऊन मी मनोरुग्ण झाले असते. माझ्या कुटुंबियांवरही त्याचा परिणाम झाला असता; पण देवाच्या कृपेने मी साधकांसह आश्रमात होते. त्यामुळे घडलेल्या प्रसंगांचा माझ्या मनावर तुलनेने अत्यल्प परिणाम झाला.

२ आ. गुरुदेवांनी कठीण प्रसंगांत मनाचा अभ्यास करून घेऊन ‘देवाच्या आधाराविना आपण काहीच करू शकत नाही’, हे लक्षात आणून देणे : गुरुदेवांच्या कृपेने मला पूर्णवेळ साधना करण्याची संधी लाभली. त्यांनी माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेतले आणि माझ्या मनाची स्थिरता वाढवली. मी कठीण प्रसंगांतही मनाचा अभ्यास करू शकले. माझी प्रकृती पहाता एखादा प्रसंग घडल्यास मला कुणाचा तरी आधार लागतो; पण गुरुदेवांनी ‘देवाच्या आधाराविना आपण काहीच करू शकत नाही’, हे माझ्या लक्षात आणून दिले. गुरुदेवांनी मला कठीण स्थितीतून बाहेर काढून स्वावलंबी बनवले. प्रसंगात उपाययोजना काढल्यामुळे आता मला वर्तमानकाळात रहाता येते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध प्रसंगांतून शिकवणे, तसेच संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करून आनंद देणे

मी आतापर्यंत प्रसंगांतून शिकण्याचा कधी प्रयत्न केला नव्हता. मी प्रसंगांतून शिकले नाही. काळच आपल्याला शिकवतो. गुरुदेवांनीच मला ‘एखाद्या प्रसंगात कसे असले पाहिजे ?’, ते शिकवले आणि घडवले. प्रसंग घडल्यावर नव्हे, तर प्रसंग घडत असतांना ‘मनाची विचारप्रक्रिया कशी होते ? त्यावर मी त्या क्षणी काय करायला हवे ?’, याविषयी ते सूक्ष्मातून मला सांगत होते. परम पूज्यच ‘मी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे वागले पाहिजे ?’, यासाठी संत आणि सद्गुरु यांच्या माध्यमातून मला मार्गदर्शन करत होते. ‘खडतर प्रसंगांत माझ्या मनाची स्थिती दोलायमान असतांना देवाने मला शिकण्याच्या स्थितीत ठेवून आनंद दिला’, त्याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

४. कार्यालयात कर्मचार्‍यांकडून चूक झाल्यास वरिष्ठ अधिकारी कर्मचार्‍यांना ओरडत असणे; मात्र साधना करतांना साधकांकडून चुका झाल्यास उत्तरदायी साधक त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगून घडवत असणे

एकदा माझ्या मनात विचार आले, ‘साधकांकडून चुका झाल्यास त्यांच्यामध्ये पालट होण्यासाठी उत्तरदायी साधक त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगतात. ‘साधकांना चुकीची जाणीव व्हावी आणि त्यांच्या साधनेची हानी होऊ नये’, असे उत्तरदायी साधकांना वाटते. गुरूंचा आपल्यावर अधिकार असतो आणि त्या हक्काने ते आपल्याला घडवण्यासाठी प्रायश्चित्ताची प्रक्रिया करत असतात.

कार्यालयात कर्मचार्‍यांकडून चुका झाल्यास वरिष्ठ अधिकारी त्यांना ओरडून सोडून देतात; पण गुरु साधकांना असे कधीच सोडत नाहीत. त्यांचे साधकांवर अमर्याद प्रेम असते. साधक प्रायश्चित्त घेत असतांना त्यांच्या मनाला ‘चुकीसाठी कारणीभूत असलेले स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची जाणीव होते आणि ते त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असतात.’

‘भगवंता, तुझ्या कृपेमुळेच तू दिलेला विचार मी ग्रहण करू शकले’, त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. संस्कृती सागवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक