विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे आरंभी होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी यांचा केवळ विज्ञानावरच विश्वास होता. ते देवधर्म मानत नव्हते. असे असले, तरी त्यांची मूळ प्रवृत्ती सात्त्विक होती; पण ते साधना करत नव्हते. नंतर त्यांच्या जीवनात असे काही प्रसंग घडले की, त्यांना देवाविषयी अनुभूती येऊन त्यांची देवावर श्रद्धा बसली. त्यानंतर ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. आता त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
पूर्वार्ध –
१. आरंभी नास्तिक असल्यामुळे देवाधर्माचे काही न करणे
‘माझ्या वयाच्या ५० वर्षांपर्यंत मी नास्तिक होतो. (आता माझे वय ७५ वर्षे आहे.) तोपर्यंत मी कुठल्याही देवळात किंवा कुठल्याही संतांकडे गेलो नव्हतो किंवा कुठलाही धर्मग्रंथ वाचला नव्हता. मी घरी देवधर्माला विरोध करत असे. मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे माझा विज्ञानावरच विश्वास होता.
२. होमिओपॅथी वैद्यकीची पदवी मिळाल्यावर वर्गातील सहाध्यायी मुलीशी आंतरजातीय विवाह करणे
वर्ष १९७३ मध्ये मी बेळगाव येथील ‘शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज’ येथून होमिओपॅथीची पदवी संपादन केली आणि लगेच त्याच वर्षी मी माझ्याच वर्गातील सहाध्यायी मुलीशी आंतरजातीय विवाह केला. मी सुखाचे स्वप्न पहात संसाराला आरंभ केला.
३. काही दिवसांनी उभयतांत प्रतिदिन भांडणे होऊ लागल्यामुळे स्वतःचे ‘नर्सिंग अँड मॅटर्निटी होम’ पत्नीला देऊन आणि दोन्ही मुलांना तिच्यावर सोपवून गोव्याला येणे
प्रारंभी माझा संसार चांगला चालला होता; पण नंतर ‘प्रतिदिन भांडणे आणि सुखाचे ४ क्षण’, असा माझा संसार होऊ लागला. तेव्हा मला ‘प्रारब्ध म्हणून काहीतरी असते’, हे ठाऊकच नव्हते. मला २ मुले झाली असल्यामुळे माझ्यावरील दायित्व वाढले होते; पण कसेही केले, तरी आमचे दोघांचे जमत नव्हते. पुष्कळ प्रयत्न करून आणि ओढूनताणूनही मी जेमतेम १४ वर्षे हा विवाह टिकवू शकलो. शेवटी मी माझे खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील ‘नर्सिंग अँड मॅटर्निटी होम’ माझ्या पत्नीला दिले. शाळेत जाणार्या माझ्या मुलांना मी तिच्यावरच सोपवले आणि गोवा येथे वैद्यकीय व्यवसाय करायचे ठरवून मी अंगावरील कपड्यांनिशी गोवा येथे आलो.
४. फोंडा, गोवा येथे एका मित्राच्या साहाय्याने आणि अधिकोषातून ऋण (कर्ज) घेऊन एक छोटेसे चिकित्सालय चालू करणे
वर्ष १९८७ मध्ये मी फोंडा, गोवा येथे एका मित्राच्या साहाय्याने आणि अधिकोषाकडून ऋण (कर्ज) घेऊन एक छोटेसे चिकित्सालय चालू केले आणि तिथेच एक छोटीशी खोली घेऊन राहू लागलो.
५. एका ख्रिस्ती कुटुंबात ‘पेइंग गेस्ट’ म्हणून रहातांना ‘स्वतःलाही अयोग्य सवयी लागतील’, याची काळजी वाटून दुसरा विवाह करायचा निर्णय घेणे
अनुमाने एका वर्षानंतर मी एका ख्रिस्ती कुटुंबात ‘पेइंगगेस्ट’ म्हणून राहू लागलो. तिथे ‘दारू पिणे, सर्व प्रकारचे मांस खाणे’, या गोष्टी सामान्य समजल्या जात होत्या. ‘त्यांच्या मुलांना काही आजारपण आल्यास त्यांना ‘ब्रँडी’ (एक प्रकारचे मद्य) देणे, सर्दी झाल्यास ‘व्हिस्की’ (एक प्रकारचे मद्य) देणे’, हे नेहमीचेच होते. ‘जेवणाआधी आणि जेवतांना दारू पिणे’, हा त्यांचा नित्यनेमच होता. मला काही आजारपण आले, तर ते मलाही ‘ब्रँडी’ किंवा ‘व्हिस्की’ घ्यायला सांगत. त्यांना ‘दूध, दही, ताक, लोणी, तूप’, हे पदार्थ ठाऊकच नव्हते. ‘हळूहळू मलाही याची सवय लागेल’, अशी मला काळजी वाटू लागली. त्यामुळे ‘इथे रहाण्यापेक्षा दुसरा विवाह करून घर करून राहिलेले चांगले !’, असे मला वाटू लागले.
६. दुसरा विवाह कुटुंबियांच्या मनाप्रमाणे स्वजातीतील मुलीशी होणे आणि फोंडा (गोवा) येथे नवीन संसाराला आरंभ होणे
दुसरा विवाह करण्याविषयी मी माझ्या घरी सांगितले. पहिला विवाह मी माझ्या मनाप्रमाणे आंतरजातीय केला होता; म्हणून मी त्यांना माझा दुसरा विवाह त्यांच्या मनाप्रमाणे करायला सांगितला. त्यानुसार वर्ष १९८९ मध्ये कुटुंबियांनी आमच्या जातीच्या (जैन) मुलीशी माझा विवाह करून दिला. नंतर फोंड्यात घर घेऊन आमच्या नवीन संसाराला आरंभ झाला.
७. विवाहानंतर काही दिवसांनी दुसर्या पत्नीला ‘स्किझोफ्रेनिया’ हा मनोविकार आहे’, असे समजणे आणि पुढे ७ – ८ वर्षे तिला तीव्र त्रास होणे
काही दिवसांनंतर ‘माझी पत्नी विचित्र वागत आहे’, असे माझ्या लक्षात आले. ती आजूबाजूच्या घरातील लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरापुढे माती टाकणे, पाणी टाकणे, घरात मोठ्या आवाजात गाणी लावून इतरांना त्रास देणे, दारे वाजवणे इत्यादी करत असे. तिला माझी थोडीही काळजी नव्हती. तिला मानसोपचारतज्ञांना दाखवल्यावर त्यांनी तिला ‘स्किझोफ्रेनिया’ हा मनोविकार असल्याचे सांगून गोळ्या चालू केल्या. ती त्या गोळ्या बाहेर टाकून देऊन ‘मी गोळ्या घेतल्या’, असे मला सांगत असे. कन्नडमध्ये एक म्हण आहे, ‘फुंकायचे देऊन ओरडणारे घेतले..’, अशी माझी स्थिती झाली. ‘मला काय करावे ?’, ते समजेना. ती काही दिवस माझ्यासह रहात असे आणि ‘नको’ वाटल्यावर मला न सांगताच बॅग घेऊन गावाकडे जात असे. तिची अशी तीव्र त्रासाची स्थिती ७ – ८ वर्षे होती. औषधाने तिला काहीच लाभ झाला नाही.
(क्रमशः)
– होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा. (२६.२.२०२४)
उत्तरार्ध वाचण्यासाठी क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/791619.html
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |