विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे आरंभी होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी यांचा केवळ विज्ञानावरच विश्वास होता. ते देवधर्म मानत नव्हते. असे असले, तरी त्यांची मूळ प्रवृत्ती सात्त्विक होती; पण ते साधना करत नव्हते. नंतर त्यांच्या जीवनात असे काही प्रसंग घडले की, त्यांना देवाविषयी अनुभूती येऊन त्यांची देवावर श्रद्धा बसली. त्यानंतर ते सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. आता त्यांनी ६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. देवानेच परिस्थिती निर्माण करून त्यांच्याकडून कशी साधना करून घेतली, ते त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहे. ७.५.२०२४ या दिवशी यातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
उत्तरार्ध
पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/791391.html
८. आई कुलदेवाची भक्ती करत असल्याने तिच्या सांगण्यावरून पत्नीला घेऊन कुलदेवाला जाणे
माझी आई कुलदेव श्री मलयाची (श्री खंडोबाची) भक्ती करत होती. ती प्रत्येक अमावास्येला देवाला जाऊन येत असे. माझा त्रास बघून ती मला ‘कुलदेवाला जा’, असे सांगत असे; परंतु मी नास्तिक असल्याने मी तिला म्हणत असे, ‘‘इतकी औषधे देऊनही पत्नीचा त्रास न्यून होत नाही. देवाला जाऊन काय होणार ?’’ शेवटी निरुपायाने मी पत्नीला मंगसुळी येथे कुलदेवता श्री मलयाच्या दर्शनासाठी घेऊन गेलो. तिथे सर्व विधी करून तिला घेऊन घरी आलो.
९. कुलदेवाला जाऊन आल्यावर काही दिवस पत्नीमध्ये चांगला पालट होणे; पण नंतर ती पुन्हा पहिल्याप्रमाणे वागू लागणे, पुन्हा कुलदेवतेला नेऊन आणल्यावर पुन्हा चांगली वागणे, असे सतत काही दिवस चालू रहाणे
कुलदेवतेला जाऊन आल्यावर दुसर्या दिवशी पत्नी सकाळी उठली, तेव्हा ती १०० टक्के बरी असल्याप्रमाणे घरातील सर्व कामे करू लागली. ते पाहून मला आश्चर्य वाटले. ती माझ्याशी सामान्य पत्नी असल्यासारखी बोलू लागली. तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. असे ८ दिवस गेल्यानंतर ती पुन्हा पहिल्यासारखे वागू लागली. मी पुन्हा तिला कुलदेवतेला घेऊन गेलो. तेव्हा ती १५ दिवस व्यवस्थित होती. त्यानंतर त्रास चालू झाल्यावर पुन्हा कुलदेवतेला नेल्यावर एक मास चांगली होती, असे चालू होते. त्यामुळे माझे सारखे कुलदेवाला जाणे चालू झाले. तेव्हा माझ्या मनात ‘कुलदेवतेला गेल्यावर पत्नी बरी असते आणि थोड्या दिवसांनी पुन्हा तिला त्रास चालू होतो’, असे का होते ?’, ‘मी देवाचे आणखी काही करायला हवे आहे का ?’, ‘ती पूर्ण बरी होण्यासाठी काय करायला हवे ?’, ‘कुणाला विचारायचे ?’, असे प्रश्न माझ्या मनात येत असत; पण त्याचे उत्तर कुणालाच ठाऊक नव्हते.
१०. कुलदेवाला जाऊन आल्यामुळे स्वतःमध्येही पालट होणे
कुलदेवाला जाऊन आल्यामुळे माझ्यातही पालट होऊ लागला. माझे मन शांत होऊन मनातील विचार न्यून होऊ लागले. माझ्या मनाला समाधान वाटत होते. असे ८ – १५ दिवस असायचे. त्यामुळे मी थोड्या थोड्या दिवसांनी कुलदेवाला जाऊन येत होतो.
११. सनातन संस्थेशी झालेला संपर्क !
११ अ. देवाच्या उपासनेविषयी समजणे : आमच्या घरापुढे रघुनंदन नावाचे दंतवैद्य रहात होते. एकदा त्यांच्या घरी कारवार येथून आधुनिक वैद्य कामत आले होते. ते एका विषयावर मार्गदर्शन करणार होते. ते ऐकायला मलाही तिथे बोलावले होते. तिथे त्यांनी सनातन संस्था आणि देवाची उपासना यांविषयी माहिती सांगितली. एक ‘एम्.डी.’ झालेले आधुनिक वैद्य देवाची उपासना करण्याविषयी सांगतांना पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
११ आ. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पणजी येथे मार्गदर्शन असणे, मार्गदर्शन ऐकून परत येतांना ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा सनातनचा ग्रंथ घेणे, हा ग्रंथ वाचल्यावर मनातील प्रश्नांची उत्तरे मिळून साधना चालू होणे : दुसर्या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पणजी येथे मार्गदर्शन होणार होते. ते ऐकण्यासाठी मी पणजीला गेलो. परात्पर गुरु डॉ. आठवले आधुनिक वैद्य असूनही देवाच्या उपासनेविषयी सांगत होते. तिथून परत येतांना मी सनातनचा ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ हा ग्रंथ घेऊन आलो. तो ग्रंथ मी एका रात्रीत पूर्ण वाचून काढला. त्यात मला हवी असलेली उत्तरे मिळाली, ‘एखाद्या व्यक्तीची साधना करून आध्यात्मिक उन्नती करण्याची क्षमता असूनही, ती व्यक्ती साधना करत नसेल, तर कुलदेवता तिची साधना चालू होईपर्यंत तिला त्रास देते.’ (आता ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या ग्रंथात हा संदर्भ आहे.) नंतर माझा सनातन संस्थेशी परिचय झाला आणि माझी साधना नियमितपणे चालू झाली. अशा प्रकारे मी सनातन संस्था आणि साधना यांकडे वळलो.’
(समाप्त)
– होमिओपॅथी वैद्य प्रकाश घाळी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७५ वर्षे), फोंडा, गोवा. (२६.२.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |