कोरेगाव (ता. खेड) येथे श्री साईबाबा मंदिराच्या जीर्णाेद्धार सोहळा
खेड, ४ मे (वार्ता.) – तालुक्यातील कोरेगाव (गावडेवाडी) येथे श्री साईबाबा मंदिराच्या जीर्णाेद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि कळशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ३ मे या दिवशी कणेरी मठ, कोल्हापूर येथील प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी असंख्य भावीक उपस्थित होते.
प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले की,
१. मनुष्याचे जीवन हे सुख-दुःख, आपत्ती-विपत्ती, मान-अपमान, जय-पराजय, अनुकूल-प्रतिकूल अशा विविध गोष्टींनी भरलेले आहे.
२. अशा परिस्थितीत सुखी, आनंदी कसे रहायचे ? हे अध्यात्मशास्त्र शिकवते.
३. मनुष्य सर्व गोष्टी देवावर सोपवतो. मी दास आहे, माझी काळजी अधिक तर देवाला आहे, असे तो म्हणतो.
४. मला शरण ये, असे सांगून देव सर्व पापे नष्ट करून मनुष्याला मोक्ष प्रदान करतो. त्याच्यापेक्षा मोठे सुख नाही. देवावर सर्व सोपवायचे आहे.
५. देवाला भेटण्यासाठी मंदिरे आहेत. सर्व पापांतून मुक्त होण्यासाठी देवाला शरण जाऊन त्याला वंदन करणे महत्त्वाचे आहे.
६. वंदन हे २ माणसांमधील संबंध जोडते. अंगी नम्रता येते. वंदन करण्यामध्ये ताकद असते. असाध्याला साध्य करण्यासाठी वंदन करावे. वंदन माणसाला पश्चाताप करायला भाग पाडते.
७. दसर्याला आपण एकमेकांना सोने देतो. संक्रातीला आपण तीळगुळ वाटतो. हा वंदनाचाच भाग आहे. सर्वांनाच वंदन करावे. दोन वेळी सूर्याला वंदन करावे. सूर्य शरिराला ऊर्जा देणारा आहे. सूर्य नसता, तर विषाणूंचा प्रकोप झाला असता.
८. आपण कुणी स्वयंभू नाही. आपण अवलंबित आहोत. दिसणारी आणि न दिसणारी जीवसृष्टी आहे. तीही आपल्याला साहाय्य करते.
९. वंदन करणार्याची हत्या कुणी करू शकत नाही. पंचमहाभूतांचा सांभाळ करणारा देव असतो.
१०. आद्यगुरूंपासून आतापर्यंतच्या सर्व गुरूंना वंदन करावे. कृतज्ञताभाव सातत्याने जागृत ठेवावा.