Loksabha Elections 2024 : २ वर्षांत गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करू ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

म्हापसा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा

म्हापसा येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर

म्हापसा, ३ मे (वार्ता.) : गोव्यातील खाणी चालू करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेकदा माझ्या कार्यालयाच्या पायर्‍या झिजवल्या आहेत. आम्ही दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून गोव्यातील खाण ‘लिज’ (‘लिज’ म्हणजे एखादी भूमी काही कालावधीसाठी वापरण्यास देणे) चालू केल्या. पुढील २ वर्षांत गोव्यातील खाण व्यवसाय पूर्ण क्षमतेने चालू करू, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हापसा येथे ३ मे या दिवशी झालेल्या प्रचारसभेत दिले. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजपचे उत्तर आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार अनुक्रमे श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे आदींची उपस्थिती होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले,

‘‘इंडी’ आघाडीकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही. या आघाडीचे सर्व नेते आपापल्या मुलांचे राजकीय भवितव्य घडवण्यात गुंग आहेत. याउलट भाजप सरकार देशाचा विकास साधण्यात व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीत एका बाजूने घोटाळेबाज ‘इंडि’ आघाडी, तर दुसर्‍या बाजूने भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही दिवस सुट्टी न घेता देशासाठी अविरतपणे कार्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद नष्ट केला आहे. याच सरकारच्या कार्यकाळात अयोध्येत श्रीराम मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

४ जूननंतर कुणीही काँग्रेसमध्ये रहाणार नाही. यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ४ जूननंतर ‘काँग्रेस ढुंढो’ मोहीम चालू करावी लागणार आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडे काँग्रेसने कायम दुर्लक्ष केलेले आहे. भाजप सरकारने छोट्या राज्यांत कायम विकास साधला आहे. केंद्रात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेवर असतांना गोव्याला १० वर्षांच्या काळात विकासासाठी केवळ ६ सहस्र कोटी रुपये मिळाले, तर केंद्रात मोदी सरकारच्या कार्यकाळात गोव्याला विकासासाठी ३५ सहस्र कोटी रुपये मिळाले आहेत.’’

काँग्रेसने देशाला लुटले, तर रमाकांत खलप यांनी गोव्याला लुटले ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

काँग्रेसने देशाला लुटले, तर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रमाकांत खलप यांनी गोव्याला लुटले. काँग्रेस धर्माच्या आधारावर राजकारण करते. काँग्रेसने गोव्याला कधीही गंभीरतेने घेतले नाही.

काँग्रेसने देशात ५० वर्षे राज्य केले; मात्र गोमंतकियांनी मागील १० वर्षांत साधनसुविधा आणि मनुष्यबळ यांचा विकास केला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सांगितले.