बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब !

रोहित पवारांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार

पुणे – मुळशी येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये यंदा ‘धनशक्ती’चा वापर होत असल्याचा आरोप केला होता. आता बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवारांनी ‘एक्स’वर ‘पोस्ट’ केली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार बारामती सहकारी बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याची माहिती आहे. मतदानाची तारीख जवळ येत असतांना आता हा नवा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रोहित पवार पुढे म्हणाले की, त्या नोटा खातेदारांना मिळत नाहीत. आता या नोटा कुठे गेल्या. याचे रहस्य काही उलगडत नाही. हा निव्वळ योगायोग आहे की, ५ दिवसांवर निवडणूक आल्याने धनशक्तीच्या सहयोगाने होणार्‍या ‘हाऊसफुल्ल शो’चा परिणाम आहे, हे बारामतीकरच ठरवतील, तसेच पुणे जिल्हा बँकेविषयीही असेच बघावे लागेल.