स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया केल्यामुळे मनातील पूर्वग्रहावर मात करून सासर्‍यांची भावपूर्ण सेवा करणार्‍या कोथरूड, पुणे येथील सौ. संगीता संजय लेंभे !

१. सासू-सासर्‍यांच्या मनातील स्वतःविषयीच्या नकारात्मक विचारांमुळे सतत संघर्ष होऊन त्यांच्याशी संबंध न ठेवणे

सौ. संगीता संजय लेंभे

‘वर्ष १९९३ मध्ये माझा विवाह झाला. आमचा विवाह माझ्या सासर्‍यांनी पुढाकार घेऊन जमवला होता; पण या विवाहाला सासूबाईंचा विरोध होता. विवाहानंतर २ वर्षे सासरे माझ्याशी अतिशय प्रेमाने वागत होते; पण सासूबाईंच्या नकारात्मक भूमिकेमुळे हळूहळू त्यांचीही भूमिका पालटू लागली. मी गोड बोलून त्यांच्या मनातील माझ्याविषयीचे विकल्प काढण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण ते सर्व प्रयत्न विफल झाल्यामुळे माझे सासू-सासर्‍यांशी फारसे संबंध राहिले नव्हते.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेमुळे पूर्वग्रहाच्या नकारात्मक विचारांवर मात करून सासर्‍यांची सेवा करायला जाणे

सहा मासांपूर्वी माझे सासरे घरामध्ये पडले आणि त्यांच्या खुब्याला दुखापत होऊन ते पुष्कळ रुग्णाईत झाले. आरंभी माझ्या मनात ‘त्यांना भेटायला जाऊ नये’, असे नकारार्थी विचार आले; पण गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (टीप) केली जात असल्यामुळे मी मनातील सासर्‍यांविषयी असलेल्या पूर्वग्रहाच्या नकारात्मक विचारांवर मात करायचे ठरवले. भगवंताने माझ्या मनात विचार दिला, ‘मी एका साधकाची सेवा करायला जाणार आहे.’ २.१२.२०२३ या दिवशी मी सासर्‍यांची सेवा करण्यासाठी पिंपोड (ता. कोरेगाव, जिल्हा सातारा) येथे गेले.

(टीप – स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुका सारणीत (वहीत केलेल्या तक्त्यात) लिहून त्या कुठल्या स्वभावदोषांमुळे झाल्या ते लिहाणे, त्या पुढे योग्य दृष्टीकोनाच्या सूचना लिहून ‘तशा चुका पुन्हा होऊ नयेत’, यासाठी दिवसभरात १० – १२ वेळा मनाला त्या सूचना देणे)

३. मनातील सासर्‍यांविषयीचा राग विसरून सासर्‍यांची सेवा मनापासून करायची ठरवणे

सासर्‍यांच्या सेवेसाठी मी पिंपोड येथे गेल्यावर त्यांची बिकट शारीरिक स्थिती पाहून माझ्या मनातला राग निघून गेला. मला पुष्कळ वाईट वाटले; पण ‘मला त्यांची सेवा करता येणार आहे’, याचे मला समाधान वाटत होते. परम पूज्यांनी सांगितल्याप्रमाणे ‘देवाण-घेवाण हिशोब संपवणे’, हे अतिशय महत्त्वाचे आहे’, या विचाराने मी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेले किल्मिष आणि पूर्वग्रह काढू शकले अन् ‘मनापासून त्यांची सेवा करायची’, असे ठरवून सेवा करायला आरंभ केला.

४. सासर्‍यांची सेवा करतांना ‘श्री गुरूंची सेवा करत आहे’, असा भाव ठेवून नामजप आणि प्रार्थना करत सेवा करू लागल्यावर सासरे प्रेमाने बोलू लागणे

सासर्‍यांसाठी अल्पाहार आणि स्वयंपाक करतांना ‘मी प.पू. गुरुमाऊलीसाठीच स्वयंपाक करत आहे. मी गुरुदेवांनाच महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी देत आहे’, असा भाव ठेवला. त्यामुळे त्या अन्नातून त्यांना आनंद आणि चैतन्य मिळत होते. मी त्यांना सर्व औषधे वेळेवर देत असे. त्यामुळे थोड्याच दिवसात त्यांची प्रकृती सुधारली आणि ते माझ्याशी प्रेमाने बोलू लागले.

५. सासर्‍यांसाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

मी भगवंताला प्रार्थना करूनच सासर्‍यांची सेवा करत असे. मी घरामध्ये भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड लावून ठेवत असे. मी सासर्‍यांना महाप्रसाद भरवतांना नामजप करत असे. मधे मधे मी त्यांच्या मस्तकावर मानसरित्या गुरुमाऊलींच्या गुरुपादुका ठेवत असे. त्यामुळे सासर्‍यांना ‘ते शंकराच्या मंदिरात आहेत’, असे वाटत असल्याचे त्यांनी मला सांगितले.

६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे सासर्‍यांचा राग न येता मागील सर्व प्रसंग सोडून देऊन सासर्‍यांची सेवा करता येणे

सासर्‍यांना प्रतिदिन १० गोळ्या आणि ३ पातळ औषधे द्यायची होती. ती देतांना त्यांना प्रत्येक गोळीचे नाव सांगून ती गोळी पाण्यात विरघळवून द्यावी लागे. एक मास प्रतिदिन मी त्यांना त्या दहा गोळ्यांची नावे सांगून गोळ्या देत असे. त्या गोळ्यांची नावे सांगतांना मला कधीही त्यांचा राग आला नाही किंवा कंटाळा आला नाही. यापूर्वी त्यांनी पुष्कळ बोलून माझे मन दुखावले होते; पण त्यांची सेवा करतांना हे सर्व मी विसरून गेले. ‘गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे देवाण-घेवाण हिशोब संपवायचा आहे’, हा एकच विचार माझ्या मनात होता. त्यामुळे माझा एक मास सतत ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप अखंड चालू होता.

२९.१२.२०२३ या दिवशी सासर्‍यांचे निधन झाले.

७. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करता येणे

मी मागील २० वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. गुरुकृपेने मला ‘आपला इतरांशी देवाण-घेवाण हिशोब असू दे किंवा नसू दे. आपल्याकडून आपण कुठल्याही प्रकारचा नवीन हिशोब निर्माण करायचा नाही. त्यासाठी सगळ्यांशी प्रेमभावाने आणि आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करायचा’, असे शिकता आले. त्यामुळे मला स्वतःचे स्वभावदोष शोधून कृतीच्या स्तरावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करता आले.

 ८. कृतज्ञता

प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने आज मी माझे आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवन उत्तम प्रकारे जगू शकत आहे. त्यासाठी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी अल्पच आहे.’

– सौ. संगीता संजय लेंभे, कोथरूड, पुणे. (१.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक