‘ई.व्ही.एम्.’ यंत्राविषयी काँग्रेसला सर्वाेच्च न्यायालयाकडून चपराक ! – पंतप्रधान मोदी

सर्वोच्च न्यायालयाने ‘ई.व्ही.एम्.’द्वारे मतदान घेण्यात येईल, असे सांगत त्या विरोधातील सर्व याचिका फेटाळून लावल्या !

पंतप्रधान मोदी

बेळगाव – काँग्रेसने कोरोना लस, ‘ई.व्ही.एम्.’ यंत्र यांच्याविषयी खोटी माहिती पसरवण्याचे काम केले आहे. भारताच्या यशाची त्यांना लाज वाटते. ‘ई.व्ही.एम्.’विषयी अफवा पसरवून काँग्रेसने एकप्रकारे भारताच्या लोकशाहीला अपकीर्त केले आहे. असे असले, तरी आता सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसला चांगली चपराक दिली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मालिनी सिटी येथे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर आणि चिकोडी मतदारसंघातील भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ २८ एप्रिलला आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

१. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शक्तीशाली भारताच्या निर्मितीसाठी त्यांचे जीवन व्यय केले, तर संत महात्मा बसवेश्वर यांनी आपल्यासाठी लोकशाहीचा रस्ता बनवला. गेल्या १० वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने देशाला शक्तीशाली बनवले आहे. आता जगभरात ‘लोकशाहीची जननी’, अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे.

२. न्यायसंहितेत सकारात्मक पालट करतांना आम्ही ब्रिटिशांचे अन्यायकारक कायदे हटवले आहेत. आता नवीन असलेल्या भारताच्या न्यायसंहितेत दंडाला नाही, तर न्याय मिळण्याला प्राधान्य दिले आहे. दुसर्‍यांवर अत्याचार करणार्‍यांसाठी आता कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

नेहा हत्या प्रकरणात काँग्रेस तुष्टीकरण करत दबाव तंत्राचा अवलंब करत आहे ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अलीकडेच हुब्बळ्ळीमध्ये महाविद्यालयाच्या आवारात नेहाची हत्या झाली. या पद्धतीच्या संतापजनक, लाजिरवाण्या घटनांमुळे काँग्रेसने राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. नेहा हत्या प्रकरणात काँग्रेस तुष्टीकरण करत दबाव तंत्राचा अवलंब करत आहे. तिला नेहासारख्या मुलींची चिंता नाही, तर मतपेढीची चिंता आहे. ‘बेंगळुरू कॅफे’मध्ये बाँबस्फोट झाला, त्या वेळीही काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.

कोल्हापूर येथे २७ एप्रिल या दिवशी झालेल्या सभेत पंतप्रधान म्हणाले, ‘‘अहद पेशावर तहद तंजावर हिंदवी स्वराज’ (पेशावर (पाकिस्तान) ते तंजावर (तमिळनाडू, भारत) हिंदवी स्वराज्य), ही घोषणा छत्रपती शिवाजी महाराजांची असून तिचा काँग्रेस कधीही स्वीकार करणार नाही.’’