काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचे भारतापेक्षा पोर्तुगालवर अधिक प्रेम ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा

वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर, गोवा

पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) : ज्या व्यक्तींनी आयुष्यात कधी या देशासाठी किंवा गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी कोणतेही काम केलेले नाही, अशा व्यक्तींना पोर्तुगीज जवळचे वाटतात आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी घटनाविरोधी केलेल्या विधानामुळे त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो. भारतापेक्षा या व्यक्तीचे पोर्तुगालवर अधिक प्रेम आहे, अशा शब्दांत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्यावर जोरदार टीका केली.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले,

‘‘आमच्यावर या देशाचे संस्कार आहेत. शाळेमध्ये आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर ‘भारत माझा देश आहे’ ही प्रतिज्ञा होती आणि असे सातत्याने म्हटल्याने देशाचे संस्कार आमच्या मनावर बिंबले आहेत. ज्या व्यक्ती भारताच्या राज्यघटनेवरच संशय घेतात, त्या या देशात उपयोगाच्या नाहीत. त्यांना भारत नकोसा वाटतो. त्यांना गोवा हे स्वतंत्र राष्ट्र हवे होते किंवा पोर्तुगालला जोडलेले राष्ट्र त्यांना हवे होते. गोव्याच्या मुक्तीलढ्यात ही माणसे गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक किंवा भारतीय सैनिक यांच्यासमवेत नव्हती. ही पिलावळ पोर्तुगालसमवेत होती. ही माणसे पोर्तुगीज झालेली आहेत आणि त्यांचे प्रेम सालाझारशाही आणि भाटकारशाही यांच्याशी आहे. त्यामुळेच अशी माणसे विधानसभेत कुणाचे तरी पुतळे उभारा, म्हणून गेली अनेक वर्षे मागणी करत आहेत. ज्या दिवशी गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून मुक्त झाला, त्या दिवशीच गोवा हा भारताचा अविभाज्य भाग बनला आहे आणि गोवा जेव्हा भारताचा अविभाज्य भाग बनला, तेव्हा भारताची राज्यघटना गोव्यात लागू झाली. आम्हाला पोर्तुगालची राज्यघटना मान्य नाही. काँग्रेसच्या उमेदवाराचे सालाझारशाहीवर प्रेम आहे. तो नेमके काय बोलतो आणि त्याचे विचार कसे आहेत, हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोक अशा लोकांना थेट घरी बसवणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस हे जॅक सिक्वेरा यांच्याप्रमाणेच बोलले आहेत.


हे ही वाचा : Loksabha Elections 2024 : नौदलाच्या कॅप्टनने राज्यघटनेच्या विरोधात बोलणे दुर्दैवी ! – राकेश अग्रवाल, माजी नौदल अधिकारी