‘व्यष्टी साधना हा साधनेचा पाया आहे. झाडाची मुळे भूमीत घट्ट रोवली गेली की, त्या झाडाचा वरील भाग चांगला वाढतो आणि त्याला सुंदर फुले अन् रसरशीत फळे लागतात. येथे झाडाची मुळे म्हणजे व्यष्टी साधना. व्यष्टी साधना, म्हणजे नामजपादी उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे, तसेच भावजागृतीसाठी प्रयत्न करणे. नामजपादी उपाय केल्याने साधकाच्या मन आणि बुद्धी यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होते. त्याच्या साधनेत वाईट शक्तींच्या त्रासामुळे येणारे अडथळे न्यून होतात. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याने मनातील अनावश्यक अन् अहंयुक्त विचार न्यून होऊन साधकाचे मन निर्मळ होऊ लागते. त्यामुळे त्याचा नामजप अधिक चांगला होऊ लागतो. भावजागृतीसाठी प्रयत्न केल्याने साधकाचे ईश्वराशी अनुसंधान वाढते आणि त्याच्या मनातील ‘ईश्वरच सर्व करून घेत आहे’, ही जाणीव वृद्धींगत होते.
अशा प्रकारे साधकाची व्यष्टी साधना चांगली झाल्याने त्याच्या वाणीतील चैतन्य वाढते आणि त्यामुळे अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना त्याने साधनेविषयी सांगितलेल्या सूत्रांचे समाजातील लोकांना आकलन होऊन ते साधना करण्यास प्रवृत्त होतात. व्यष्टी साधना चांगली असल्याने त्याची ईश्वरी विचार ग्रहण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे इतर सेवा करतांनाही ‘सेवा उत्साहाने होणे, त्या अल्प वेळेत पूर्ण होणे, सेवा परिपूर्ण अन् अचूक होणे, सेवेत नवनवीन सूत्रे सुचणे’ इत्यादी साध्य झाल्याने त्याच्या सेवेची फलनिष्पत्तीही वाढते.
साधकांनो, व्यष्टी साधना चांगली करून साधनारूपी झाडाचे मूळ बळकट करा आणि समष्टी साधनेची फलनिष्पत्ती वाढवून या झाडाला लागलेली आनंदाची फळे चाखा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले