अमेरिकेतील प्रथितयश ‘प्रिन्सटन विद्यापिठा’तील कारवाई !
न्यू जर्सी (अमेरिका) – इस्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनचे समर्थन करण्याचा प्रकार अमेरिकेत वाढीस लागला आहे. पॅलेस्टाईनला निर्दोष दाखवण्याचे कथानक रचले गेले आहे. अशातच ‘आयव्ही लीग’ नावाने प्रथितयश समजल्या जाणार्या ८ अमेरिकी विद्यापिठांपैकी एक असलेल्या प्रिन्सटन विद्यापिठातही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन केले जात होते. यामध्ये भारतीय वंशाची विद्यार्थिनी अचिंथ्य शिवलिंगम् सहभागी झाल्याने तिला विद्यापीठातून अटक करण्यात आली आहे. ‘तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल’, असे सांगण्यात येत आहे.
१. तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे जन्मलेल्या आणि ओहायो राज्यातील कोलंबस येथे राहिलेल्या अचिंथ्याला २५ एप्रिल या दिवशी सहकारी विद्यार्थी हसन सय्यद याच्यासह अटक करण्यात आली.
२. ते विद्यापिठाच्या मॅककॉश प्रांगणात तंबू ठोकून आंदोलन करत होते. आरंभी अनुमाने ११० लोकांचा जमाव होता. कालांतराने याला प्रतिसाद वाढत गेला आणि दुपारपर्यंत ३०० जण जमले.
३. ‘सार्वजनिक सुरक्षा विभागाकडून आंदोलन थांबवण्यासाठी चेतावणी दिल्यानंतर २ पदवीधर विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली’, असे विद्यापिठाकडून सांगण्यात आले.
४. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापिठातही १०० हून अधिक लोकांना अटक केल्यानंतर हार्वर्ड आणि येल यांसह संपूर्ण अमेरिकेतील प्रमुख विद्यापिठांमध्ये आंदोलने तीव्र करण्यात आली आहेत.
५. ‘रॉयटर्स’नुसार गेल्या एका आठवड्यात जवळपास ५५० जणांना अटक करण्यात आली आहे.