Loksabha Elections 2024 : मतांसाठी धर्माच्या आधारे भेदभाव करू नये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २५ एप्रिल (वार्ता.) :  गोव्यात धर्माच्या आधारावर राजकारण का केले जात आहे ? गोवा सरकारमध्ये अल्पसंख्य मंत्री आणि आमदार आहेत. धर्म आणि राजकारण हे एकमेकांत मिसळू नये. मतांसाठी धर्माच्या आधारावर भेदभाव करू नये. गोव्याच्या आर्चबिशपनी धर्मनिरपेक्ष उमेदवाराला मतदान करण्याच्या केलेल्या आवाहनाचे आम्ही स्वागत करतो. भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

‘गोव्यातील भूमी इतरांना विकल्या जाऊन गोव्याची अस्मिता नष्ट होईल का ?’, या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोव्याला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि या कालावधीत गोव्याच्या अस्मितेवर कुणीही घाला घालू शकलेला नाही. गोव्यावर कुणीही नियंत्रण मिळवू शकणार नाही. पोर्तुगिजांनी गोव्यावर राज्य केले तेवढे पुरे. आम्हाला गोव्याची अस्मिता टिकवून ठेवायची आहे आणि यासाठी गोव्याची शेती अन् फळबागायती यांची भूमी टिकवून ठेवायची आहे. गोव्यातील पडिक भूमीचे कोणत्याही कारणासाठी रूपांतर केले जाणार नाही, याची सरकार काळजी घेईल.’’

डॉ. सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात मागील ५० वर्षांत न झालेल्या पायाभूत सुविधा मागील १० वर्षांत भाजप सरकारच्या कारकीर्दीत झालेल्या आहेत. काही लोक पायाभूत सुविधा प्रकल्पांना कारणाविना विरोध करतात. सांगे येथे सरकारी भूमीत येणार्‍या भारतीय तंत्रज्ञान संस्थेला (आयआयटीला) विरोध का करतात ? गोवा शिक्षण क्षेत्रात मुख्य ठिकाण झाल्यास त्याचा लाभ गोमंतकियांनाच होणार आहे. विरोधी पक्ष म्हादई प्रश्न, रेल्वे दुपदरीकरण, तम्नार वीजवाहिनी प्रकल्प आदींना कोणतेही कारण नसतांना विरोध करतात. तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाचे केवळ ६ खांब घालणे राहिले आहे आणि बाकी सर्व काम पूर्ण झालेले आहे. या प्रकल्पांतर्गत कर्नाटकमधून नव्हे, तर महाराष्ट्रातून वीज घेतली जाणार आहे. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अल्प होणार आहेत.’’