निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून २१ लाख रुपये जिंकण्याचे अंनिसचे आव्हान !
पुणे – मी अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सिद्ध आहे आणि आता अंनिसनेही प्रसारमाध्यमे अन् जनतेसमोर सार्वजनिक कार्यक्रमात पुढे यावे ! अंनिस सांगेल त्या ठिकाणी केव्हाही मी येण्यास सिद्ध आहे. भोंदूगिरी पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्येक वेळी केवळ भोंदूगिरी पसरवते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते हे करत आहेत. अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे; कारण ते केवळ आव्हाने देतात आणि कधीच समोर येत नाहीत, असे सडेतोड उत्तर ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी महाराष्ट्र अंनिसला दिले आहे. (अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) ‘लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि २१ लाख रुपये जिंका’, असे जाहीर आव्हान अंनिसने ज्योतिषांना दिले आहे. त्याला ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत अंनिसचे आव्हान स्वीकारले आहे.
अंनिसच्या वतीने डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, सम्राट हटकर आदींनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात याविषयीची प्रक्रिया आणि प्रश्नावली दिली आहे. त्यानुसार या प्रक्रियेत सहभागी होणार्यांना समितीकडून ती प्रश्नावली दिली जाईल. ‘अंनिस’चे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी सांगितले की, ‘फलज्योतिष हे शास्त्र नाही,’ ही आमची भूमिका आहे. या स्पर्धेमागे, तसेच चिकित्सेमागे फलज्योतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमोर यावी, हाच उद्देश आहे. (फलज्योतिषी आणि ज्योतिषाच्या अन्य प्रकारांमागील विज्ञान अंनिसला यापूर्वी अनेक जणांनी सांगितले आहे. तरी ज्यांना ते मान्यच करायचे नाही, ज्यांच्यात जिज्ञासाच नाही, ते कसे मान्य करतील ? – संपादक)
संपादकीय भूमिका :कुणी आव्हाने स्वीकारली की, शेपूट घालून पळणारी अंनिस याही वेळी वेगळे काही करणार नाही ! |