संपादकीय : भारतद्वेषी मुइज्जू यांचा विजय !

महंमद मुइज्जू आणि शी जिनपिंग

चीनच्या हातचे बाहुले बनलेले मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्याच्या तुकड्या मायदेशी पाठवण्याचा आदेश देऊन भारतद्वेषाचा कंड शमवून घेतला. यानंतरच्या काळात त्यांच्या या भूमिकेला विरोधी पक्ष आणि जनता यांच्याकडून विरोध झाला. इतकेच नाही, तर मुइज्जू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यामुळे त्यांच्यावर महाभियोगाची टांगती तलवार होती. असे असतांना तेथील निवडणुकीत मुइज्जू यांच्या ‘पीपल्स नॅशनल काँग्रेस’ या पक्षाचे उमेदवार ९३ पैकी ६७ जागांवर निवडून आले. आता दोन तृतीयांश बहुमत मिळवल्याने ‘माझा निर्णय योग्य होता’, असे म्हणण्यास मुइज्जू यांना वाव आहे. मुइज्जू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी उघडपणे भारतविरोधी भूमिका घेतली होती. या निवडणुकीत लोकांनी त्यांच्या पक्षाला भरघोस पाठिंबा दिल्याने मुइज्जू अधिक त्वेषाने भारतविरोधी धोरणे राबवतील, यात शंका नाही. या निवडणुकीत मालदीवमध्ये ७५ टक्के मतदान झाले. यावरून तेथील जनतेचा मुइज्जू यांच्या ‘इंडिया आऊट’ आणि चीनशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे या धोरणांना पाठिंबा आहे, असे आपण म्हणू शकतो. मुइज्जू यांच्या पक्षाच्या या विजयामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. भविष्यात त्यांनी भारतविरोधी निर्णय घेतल्यास आणि तो चीनच्या अधिक जवळ गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. भविष्यात भारत मालदीवला कशा प्रकारे हाताळतो आणि त्याला हाताळतांना आक्रमक कि मवाळ परराष्ट्रनीती राबवणार, हे पहावे लागेल.

साडेपाच लाख लोकसंख्येचा मालदीवसारखा देश वर्षानुवर्षे मैत्री असलेल्या भारताच्या एकदम विरोधात जातो आणि पुढे सातत्याने भारतविरोधी कारवाया करतो, हे त्याच्यावरील वाढत्या चिनी प्रभावाचा परिणाम होय. मालदीव हा अगोदरच चीनने दिलेल्या कर्जाच्या विळख्याखाली दबलेला असून चीनप्रेमात अंध झालेल्या मालदीवने श्रीलंकेप्रमाणे काही बेटे, भूभाग चीनला वापरण्यास दिला, तर नवल वाटू नये. वर्ष २०१४ पासून भारताचे सैनिकी सामर्थ्य वाढत असून सक्षम परराष्ट्रनीतीमुळे अनेक देश त्याच्याशी जोडले जात आहेत. हीच गोष्ट चीनच्या डोळ्यांत खुपत असून प्रामुख्याने भारताच्या आजूबाजूला असलेल्या मालदीवसारख्या राष्ट्रांना तो भारतविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडत आहे. मालदीवने तेथे रहाणार्‍या १२ देशांतील १८६ नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र यात एकही चिनी नागरिक नाही, हे विशेष. चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या आशियाई आणि युरोपीय देशांना जोडणार्‍या बहुराष्ट्रीय प्रकल्पात आता मालदीव सहभागी झाला आहे.

मालदीव दुसरा ‘सीरिया’ बनण्याच्या मार्गावर !

कधीकाळी मालदीववर हिंदु राजा ‘चोल’ वंशाचे राज्य होते. तोच मालदीव आज इस्लामबहुल झाला आहे. येथे पर्यटकांना सार्वजनिक ठिकाणी पूजा करण्यास मनाई असून या देशातील नागरिकांना इस्लाम सोडून अन्य धर्मात प्रवेश करण्यास मनाई आहे. धर्मपरिवर्तन करणार्‍यांना शरीयत कायद्याप्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा मिळते. वर्ष २०२२ मध्ये देवतांच्या मूर्ती ठेवल्या म्हणून ३ भारतीय पर्यटकांना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षीच मुइज्जू सत्तेत आल्यापासून मालदीवमध्ये कट्टरतावाद इतक्या झपाट्याने वाढत आहे की, त्याला आळा न घातल्यास त्याचा दुसरा ‘सीरिया’ होऊ शकतो. मुइज्जू हे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे अनुयायी मानले जातात. यामीन यांच्या काळात धार्मिक कट्टरतावाद पुष्कळ वाढला होता. आताही मोठ्या प्रमाणात लोकांनी दाढी वाढवणे, सैल कपडे आणि पायजमा घालणे, डोक्याभोवती अरबी शैलीतील चामड्याच्या रिंग घालणे असा इस्लामी पेहराव करण्यास प्रारंभ केला आहे. मुइज्जू सत्तेत आल्यापासून धार्मिक नेते सातत्याने विविध ‘फतवे’ घोषित करत आहेत. नुकतेच मौलानांनी शरिरावर ‘टॅटू’ काढणे हराम आहे आणि तसे केल्यास संबंधितांच्या विरोधात इस्लामिक कायद्यानुसार कारवाई करण्याची घोषणाही केली आहे. मालदीवमधील बरेच कट्टरतावादी तरुण इस्लामीक स्टेटमध्ये सहभागी झाले आहेत. मालदीवमध्ये कट्टरतावाद्यांची संख्या वाढल्यास त्यांची आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकशी जवळीक वाढेल. त्याचा फटका भारताला बसल्यास आश्चर्य वाटणार नाही.

भारतासाठी कसोटीचा काळ !

मार्च २०२४ मध्ये चीन आणि मालदीव यांच्यात संरक्षण करार झाला. यात चीन मालदीवला विनामूल्य सैनिकी साहाय्य करील, असे ठरले आहे. या करारानुसार चीन मालदीवला घातक शस्त्रे देणार आहे, जी पुढे जाऊन भारताच्या विरोधात वापरली जाऊ शकतात. चीनने मालदीवला १२ पर्यावरणपूरक रुग्णवाहिका, कचरा गोळा करण्यासाठी १० नागरी वाहने भेट दिली आहेत. यापुढील काळात चीन मालदीवच्या माले शहरातील सर्व रस्ते विनामूल्य बांधून देणार असून चीनने मालदीवला दीड सहस्र टन पिण्याचे पाणीही पुरवले आहे. इतके सगळे साहाय्य विनामूल्य मिळत असल्याने मालदीव चीनच्या प्रेमात अंध झाला असून ‘चीन सांगेल ती पूर्वदिशा’ अशी त्याची स्थिती झाली आहे. चीन कधीही कुणालाही विनामूल्य साहाय्य करत नाही, हा इतिहास आहे. लवकरच मालदीवची अवस्थाही श्रीलंकेप्रमाणे भूकेकंगाल होईल; मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !

मालदीव आणि भारतामध्ये केवळ २ सहस्र किलोमीटरचे अंतर आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मालदीव हा हिंद महासागरात वसलेला आहे. याचसमवेत ‘सार्क’ या ८ दक्षिण आशियाई देशांच्या संघटनेचा एक सदस्य मालदीवही आहे. वर्ष २०१६ मध्ये उरी येथील आक्रमणानंतर पाकिस्तानात झालेल्या ‘सार्क’ परिषदेवर भारताने बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते, तेव्हा केवळ मालदीवने पाठिंबा दिला होता. तोच मालदीव आज चीनमुळे भारताच्या विरोधात भूमिका घेण्यास जराही कचरत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या मालदीववर चीनचा वाढता प्रभाव भारतासाठी डोकेदुखी आहे.

प्रत्येक कुलुपाला चावी असतेच. त्याप्रमाणे मालदीवमध्ये भारतद्वेष्टे सत्तेवर आल्यामुळे होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यासाठी भारत भविष्यात नक्कीच उपाययोजना काढेल, यात शंका नाही. ज्या वेळी एखादा देश संरक्षण आणि अर्थ क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करून आत्मनिर्भर होतो, तेव्हा जागतिक स्तरावर तो राबवत असलेली धोरणेही आक्रमक असतात. त्यामुळे मालदीव आणि त्याचा मित्र चीन यांना वठणीवर आणायचे असेल, तर भारताने सर्वच क्षेत्रांत अधिकाधिक सक्षम होणे आवश्यक आहे !

चीनच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या मालदीववर भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष ठेवणे अत्यावश्यक !